आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांसाठी पक्षनेतृत्वालाच आव्हान; येवल्यात रास्ता रोको आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला (जि. नाशिक) - नाशिक लोकसभेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातूनच या निर्णयाला विरोध होत आहे. भुजबळांची उमेदवारी रद्द करावी, त्यांना विधानसभेतच ठेवावे, या मागणीसाठी येवल्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शहर बंद ठेवत नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मागणी मान्य न झाल्यास राजीनामा देण्याचा इशाराही पदाधिकार्‍यांनी दिला.

सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते घोेषणाबाजी करीत रास्ता रोकोसाठी उतरले. या वेळी ‘एकीचे बळ छगन भुजबळ,’ ‘जाऊ नका, जाऊ नका भुजबळसाहेब जाऊ नका,’ ‘येवला पॅटर्नचे शिल्पकार छगन भुजबळ, छगन भुजबळ’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. काही कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांचे छायाचित्र गळ्यात अडकविले होते. रास्ता रोको आंदोलनातून स्थानिक पदाधिकार्‍यांनी पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याचे दिसत होते. या आंदोलनामुळे राज्य महामार्गाच्या दुतर्फा दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

भुजबळांनाच उमेदवारी का?
भुजबळांना विकासासाठी येवल्यात पाठवले मग बदल का, असा सवाल म्हाडाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी केला. येवल्याचा विकास अजून होणे बाकी आहे. त्यामुळे भुजबळांची लोकसभेची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले होते. मग राष्ट्रवादीच्या 18 मंत्र्यांमध्ये फक्त भुजबळांनाच का उमेदवारी दिली, असा प्रश्न उपसभापती प्रकाश वाघ यांनी उपस्थित केला. हा भुजबळांवर अन्याय असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

पवारांसमोर आंदोलनाची तयारी
शरद पवार जोपर्यंत भुजबळांची उमेदवारी रद्द करत नाहीत तोपर्यंत कोणत्याही बैठकांना हजर राहणार नाही, असा इशारा समता परिषदेचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी दिला. भुजबळांनी बांधकाम व पर्यटन क्षेत्रालाही न्याय दिला असल्याचे सांगत कुणाल दराडे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. भुजबळांनी विकासकामांमध्ये येवला पॅटर्न आणला. जनतेशी नाळ जोडली. आता ही नाळ पवारसाहेबांनी तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक झांबरे यांनी केली.

पंकज भुजबळांचे आवाहन
रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास पदाधिकारी तयार होत नसल्याने आमदार पंकज भुजबळ यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावत कार्यकर्त्यांची समजूत काढली. ‘भुजबळांचे येवल्यावर सदैव प्रेम राहील. तुमच्या भावना समजू शकतो, निश्चितच आपली मागणी भुजबळांपर्यंत पोहोचवेन. आपण आंदोलन मागे घ्या’, अशी विनंती केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले.

खासदार समीर यांचीही भेट
खासदार समीर भुजबळ हे दुपारी 1.30 वाजता हेलिकॉप्टरने येवल्यात आले. यानंतर त्यांनी संपर्क कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांची समजूत घातली. भुजबळसाहेबांपर्यंत भावना पोहोचवण्याचे आश्वासन दिले. भुजबळांवर पक्षाने उमेदवारी लादली नसून, चर्चेअंती हा निर्णय झाला आहे. भुजबळांनी येवल्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेले. आता नाशिक लोकसभेच्या माध्यमातून देशपातळीवर भुजबळांना काम करावयाचे आहे. नाशिकचा आवाज देशपातळीवर नेण्यासाठी व नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी भुजबळांनी निर्णय घेतल्याचे सांगितले. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्याचे काम करेल, असे आश्वासन भुजबळसाहेबांनी शरद पवारांना दिले आहे, याची आठवण त्यांनी क रून दिली.