आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal News In Marathi, Nashik Lok Sabha Constituncy, NCP, Divya Marathi

भुजबळ यांचा बहुतांश वेळ डॅमेज कंट्रोलवर होतोय खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कॉँग्रेस पदाधिकार्‍यांनी नाराजी व राष्ट्रवादीअंतर्गत धुसफूस यामुळे अखेरच्या टप्प्यात हेविवेट उमेदवार छगन भुजबळ यांचा बहुतांश वेळ डॅमेज कंट्रोलवर खर्च होताना दिसत आहे. मंगळवारी रात्री नाशिक तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या गुप्त बैठकीत कार्यकर्त्यांनी एकत्रीकरणासाठी विलंबाने झालेली बैठक व प्रचार यंत्रणेवर नियंत्रण कोणाचे असे प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.


कॉँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नाराजी नाट्यावर तूर्तास पडदा पडला असला तरी, याच असंतोषाची लागण नाशिक तालुका, देवळाली विधानसभा मतदारसंघ तसेच इगतपुरी तालुक्यातील काही नेत्यांना झाल्यामुळे राष्ट्रवादीसमोरील अडचणी कायम आहेत. राष्ट्रवादीत सध्या प्रचार व नियोजन करणारे असे दोन वेगवेगळे गट असल्यामुळे अप्रत्यक्षपणे एकमेकांविरोधात जबाबदारी ढकलण्याचे किंबहुना आरोप-प्रत्यारोपाचे प्रकार सुरू झाले आहे. त्यातून दहा दिवसावर मतदान असताना अनेक भागात कार्यकर्त्यांपर्यंत प्रचाराचे साहित्यच पोहोचलेले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी आघाडीतील ज्येष्ठांना डावलून नवीन कार्यकर्त्यांकडे प्रचाराची धुरा दिलेली आहे. दिवसोंदिवस धुसफूस वाढत असल्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भुजबळ किंबहुना आघाडीतील नेत्यांवर समजूत काढण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठवलेल्या निरीक्षकांच्या बैठकीतही नाराजीचा सूर उमटला होता. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील बैठकीत त्याचीच पुनरावृत्ती झाल्यानंतर मंगळवारी मात्र स्वत: भुजबळ यांनीच वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या मध्यस्थीने नेमकी नाराजी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


सूचनांद्वारे गांधीगिरी
दोन बैठकांना स्वत: भुजबळ नसल्यामुळे नाराजांनी उघडपणे मन मोकळे केले. मात्र, मंगळवारच्या बैठकीला स्वत: भुजबळ समोर असल्यामुळे नेत्यांनी सुचनाद्वारे प्रचारातील त्रुटी लक्षात आणून दिल्या. त्यामुळे प्रचाराची यंत्रणा नेमकी कोणाकडे आहे असेही सवाल करून असमन्वयाकडे लक्ष वेधण्यात आले. जरा प्रचारात जुन्या जाणत्यांना सामावून घ्या, नाशिक तालुक्यात शरद पवार किंवा अन्य वजनदार नेत्याची सभा लावा, स्थानिक उमेदवाराला रोखण्यासाठी स्थानिकांना बळ द्या अशा सूचना करून नेमकी खदखद गांधीगिरीने मांडण्याचे प्रयत्न झाले.


नाराज कॉँग्रेसजनांसाठी राष्ट्रवादी भवनात केबिन
लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने कॉँग्रेस-राष्ट्रवादीत सुरू असलेला सुप्त संघर्ष अद्यापही कायम असून समझोत्यासाठी एक पाऊल पुढे उचलून राष्ट्रवादी भवनात कॉँग्रेस पदाधिकार्‍यांसाठी एक खास केबिन देण्यात आली आहे. मात्र, येथे चर्चा व प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी ज्येष्ठ कॉँग्रेस पदाधिकारी व नगरसेवक फिरकत नसल्याची खंत राष्ट्रवादीकडून व्यक्त होत आहे.


ग्रामीण भागात राष्ट्रवादीला कॉँग्रेसकडून असहकार होत असताना शहरातही वेगळी परिस्थिती नाही. कॉँग्रेसचे माजी मंत्री, आमदार, आजी-माजी नगरसेवक प्रचारापासून लांब आहेत. मध्यंतरी खासदार समीर भुजबळ यांनी बैठक घेऊन कॉँग्रेसच्या नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही बोटावर मोजण्याइतक्याच अपवादवगळला तर, ठोस भूमिका व प्रयत्न कोणाकडूनही होताना दिसत नाही. त्यामुळे कॉँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी उल्हास सातभाई यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी भवनात प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी आता मदत घेतली जात आहे. त्यासाठी एक स्वतंत्र केबिन कॉँग्रेसजनाना देण्यात आली आहे.