आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal News In Marathi, Nashik Municipal Corporation, Divya Marathi

भुजबळांच्या विरोधातील दोन नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक मतदारसंघात शिवसेनेची लढाई ही छगन भुजबळ यांच्याविरोधात आहे, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असतानाच; दुसरीकडे भुजबळांच्या विरोधातील दोन पक्षांच्या नगरसेविकांना सेनेने आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे भुजबळांच्या विरोधातील लढाई काही प्रमाणात कच्ची तर झालीच; शिवाय जनराज्य आघाडीच्या दुखावलेल्या नेत्यांचीही सेनेकडे वक्रदृष्टी होते की काय, अशी भीती आता उमेदवारासह कार्यकर्त्यांना भेडसावत आहे.


माकपच्या नगरसेविका नंदिनी जाधव व जनराज्य आघाडीच्या नगरसेविका शोभा निकम यांनी हॉटेल सूर्या येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच ठाकरे यांची शुभेच्छा भेट घेण्यासाठी सेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाधव आणि निकम यांची मनधरणी केली होती. त्यानुसार झालेली भेट ही पक्षप्रवेश असल्याचे बडगुजर यांच्याकडून त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, नंतर दोन्ही नगरसेविकांनी आपण पक्षप्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले होते. आता सोमवारी पुन्हा एकदा प्रवेशनाट्य रंगले. या प्रवेशाने पक्षाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होणार असल्याचे काहींनी उद्धव यांच्या निदर्शनास आणून दिले. वास्तविक, जनराज्य आणि माकप हे दोन्ही पक्ष भुजबळ यांचे विरोधक आहेत. निवडणूक काळात हा विरोध शिवसेनेच्याच पथ्यावर पडणारा होता. प्रत्यक्षात या पक्षांचेच नगरसेवक शिवसेनेने फोडल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी सेनेला नुकसानच होईल, अशा भीतीने शिवसैनिकांना ग्रासले आहे.