आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal News In Marathi, Nationalist Congress, Nashik Lok Sabha Constituncy

भुजबळांचा 3 दिवस सिन्नरला तळ,नाराज कोकाटेंमुळे प्रचाराचे नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीचा निर्णायक टप्पा सुरू असताना, कॉँग्रेसमधील नाराजीमुळे अडचणीत सापडलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी बुधवार ते शुक्रवार असे तीन महत्त्वाचे दिवस सिन्नरमध्ये तळ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार माणिकराव कोकाटे गटाची नाराजी दूर झाली तर ठीक, अन्यथा प्रकाश वाजे व अन्य सर्मथकांची मोट बांधून प्रचाराची रणनीती आखली जाणार आहे.


नाशिक लोकसभा मतदारसंघात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सर्मथकांनी राष्ट्रवादीला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. कोकाटे यांचे कट्टर सर्मथक बाळासाहेब वाघ यांनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यानंतर पेटलेल्या ठिणगीचा वणवा पेटून कोकाटे यांच्या सर्मथकांनी सिंधुदुर्गमधील राष्ट्रवादी-कॉँग्रेसमधील वादाचा मुद्दा पेटता ठेवला. जर सिंधुदुर्गमध्ये कोकाटे यांचे गुरू नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश यांना राष्ट्रवादी मदत करत नसेल तर कॉँग्रेसने नाशिकमध्ये राष्ट्रवादीला का मदत करावी, असा सवाल केला. मात्र, सिंधुदुर्गमध्ये खुद्द शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर सिन्नरमध्येही आता कोकाटे यांना एक पाऊल मागे घेण्याची वेळ आली आहे. त्याबाबत मंगळवारी कोकाटे सर्मथक चाचपणी करून निर्णय घेणार आहे.


तिकडे कोकाटे यांच्या संभाव्य भूमिकेबाबत फार विचार न करता भुजबळांनी सिन्नरकडे लक्ष केंद्रित केले आहे. या भागात समझोता झाला तरी दगाफटका होण्याची भीती असल्यामुळे 16 ते 18 एप्रिलला सिन्नरला तळ ठोकण्याची त्यांची रणनीती आहे. या काळात सिन्नर शहराबरोबरच राष्ट्रवादीच्या ताब्यातील तीन जिल्हा परिषद गट व ग्रामीण भागातील व्होट बॅँक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी प्रकाश वाजे यांच्या गटाची मदत घेतली जाणार आहे.


आमदार कोकाटे यांच्याबाबत उत्सुकता
रविवारी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, त्याला समोर उभे केले जाईल, असे जाहीर केले. मंगळवारी मात्र छगन भुजबळ हे संपूर्ण दिवस नाशिक शहरात प्रचार करणार असल्यामुळे कोकाटे नेमके कोणाला पाठिंबा देतात व कोणाला हजर करतात, याविषयीही चर्चा सुरू आहे.