आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal News In Marathi, Nationalist Congress, Nashik Lok Sabha Constituncy

राष्ट्रवादीसमोर ‘रात्र थोडी सोंगे फार’, नवीन विरूध्‍द जुने अशी लढाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या छगन भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीसाठी निवडणूक सोपी मानली जात होती. प्रत्यक्षात मात्र, जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’ अशी परिस्थिती निर्माण होत आहे. एकीकडे निवडणुकीत मराठा विरुद्ध इतर असा प्रचार चालवला असताना राष्ट्रवादीत नवीन विरुद्ध जुने असा संघर्षही पदाधिकारी खासगीत मान्य करतात. त्यामुळे भुजबळ यांची बाहेरच्यांची मनधरणी करू की घरच्यांची, अशी अवस्था झाल्याचेही चित्र आहे.


लोकसभा निवडणुकीत यंदा शरद पवार यांनी अखेरपर्यंत उमेदवारीचे घोंगडे भिजत ठेवले. विद्यमान खासदार समीर भुजबळ यांची जाहीरपणे पाठ थोपटून त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. मात्र, ऐनवेळी लोकसभेतील आपल्या रिक्त जागेसाठी भुजबळ यांना बढतीवर पाठवण्याचे कारण देत त्यांच्या गळ्यात माळ टाकली.


यानिमित्ताने भुजबळ यांची निवडणूक राष्ट्रवादीसाठी किती प्रतिष्ठेची आहे हेही पवार यांनी अधोरेखित केले. प्रत्यक्षात प्रचार सुरू झाल्यावर राष्ट्रवादीत राजी-नाराजीचे सूर उमटू लागले. सर्वप्रथम छगन भुजबळ यांच्या जेवणावळीमुळेही काही मंडळी दुखावली गेली. त्यानंतर प्रचारातही अशीच परिस्थिती आहे. कॉँग्रेस व अन्य पक्षाच्या पदाधिकार्‍यांना खुश करण्याच्या नादात दरवाजापर्यंत येऊनही भुजबळ आपल्या घरात पाऊल ठेवत नाही, अशीही खंत व्यक्त होत आहे.


स्टार प्रचारकांची कमी
खरे तर भुजबळ म्हटल्यावर नेत्यांच्या सभांचा जोरदार बार उडेल असे वाटत होते. प्रत्यक्षात शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा सोडली तर, सर्व भिस्त भुजबळांवरच आहे. अखेरच्या टप्प्यात शरद पवार यांची सभा घेण्याचे नियोजनही अद्यापतरी गॅसवरच आहे. सोनिया गांधी यांच्या सभेसाठी कॉँग्रेसकडून अद्यापही उत्तरच आलेले नाही. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. सर्वांचेच तोफगोळे भुजबळांच्याच दिशेने येत असल्यामुळे अर्धावेळ त्यांना उत्तरामध्येच द्यावा लागत आहे. राष्ट्रवादीत तोडीस तोड उत्तरे देणारी फळीही नसल्यामुळे सर्व भिस्त भुजबळ यांच्याच खांद्यावर आहे.


मॅनेजमेंटवरूनही मतभेद
राष्ट्रवादीत नवीन व जुने असा वाद पूर्वीपासून असून, लोकसभा निवडणुकीच्या मानपानाच्यानिमित्तानेही त्यात भर पडत आहे. राष्ट्रवादीत संघटनात्मक रचनेनुसार ज्यांना पदे दिली त्यांच्याकडे प्रत्यक्षात प्रचारासाठी फिरणे व हाताखालील कार्यकर्त्यांच्या याद्या करून त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचवण्यापलीकडे काहीच नाही. महत्त्वाच्या गोष्टींची जुळवाजुळव करण्याचे अधिकार खास लोकांकडेच असल्यामुळे पदाधिकार्‍यांना त्यांच्याकडे हात पसरावे लागत असल्याची बाब रुचत नाही. त्याबाबतही खासगीत पदाधिकारी एकमेकांकडे बोट मुरडत आहेत. त्यामुळेच की काय कोणी एकेकाळी भुजबळ यांच्या खांद्याला खांदा भिडवून प्रचारात उतरणारे जुने -जाणते पदाधिकारी केवळ हजेरीपुरतीच भूमिका निभावताना दिसत आहेत.


अजित पवारांकडून नेमकी चाचपणी का व कशासाठी?
निवडणूक ऐनभरात असताना पक्षातील नाराज मराठा समाजाच्या नेत्यांना भुजबळ यांच्या प्रचारार्थ सक्रिय करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका खास दूताकरवी घेतलेली बैठकही गाजत आहे. मुळात याविषयी दोन मतप्रवाह आहेत. ही बैठक घेताना भुजबळ किंवा त्यांच्या जवळच्या सर्मथकांना आवतनही नव्हते, किंबहुना माहितीही नव्हती. जर खरोखरच भुजबळ यांच्या मदतीसाठी बैठक होती तर कल्पना का दिली गेली नाही. बैठकीत खास पवार यांनी पाठवलेला दूत असूनही मराठा समाजाचे नेते जाहीररीत्या आक्रमक झाले. विशेष म्हणजे बरोबर नाराजांना हेरून त्यांना एकत्र आणण्याची भूमिका एका माजी खासदाराने तथा राष्ट्रवादीतील एका आमदारकीसाठी बंडखोरी केलेल्या नगरसेवकांनी कशी वठवली, अशा प्रश्नांनी अखेरच्या क्षणांमध्ये राष्ट्रवादीत चर्चेचे वादळ उठले आहे. त्यामुळे नेमकी अजित पवार यांनी कशासाठी चाचपणी केली, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.