आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Affected For 'alert' Operating System

‘सतर्क’ कार्यप्रणालीने मुख्यमंत्री प्रभावित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘सतर्क’ साॅफ्टवेअरच्या सादरीकरणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी प्रभावित झाले. असे साॅफ्टवेअर शासनाच्या आयटी विभागामध्येही सुरू करण्यासाठी आदेश देण्यात येणार असल्याचे सांगत शहराच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे औपचारिक उद्््घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. पोलिस ठाण्याची एखाद्या कार्पोरेट अाॅफिससारखी रचना पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी ‘सतर्क’चे सादरीकरण केले. त्यात गुन्ह्याची सर्व माहिती, तपास, दोषारोप आणि गुन्ह्यात मिळालेल्या शिक्षेचे स्वरूप यामध्ये जतन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या साॅफ्टवेअरच्या अाधारे तपासी अधिकारी कुठेही संगणकावर इंटरनेटद्वारे कामकाज करू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे शहर आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सर्वप्रथम ‘सतर्क’ विकसित केले. नाशिक पोलिसांनी तत्परता दाखवत त्याचा लाभ घेतल्याचे सांगून यामुळे गुन्ह्यांची तत्काळ उकल होत असल्याने शहर पोलिसांचे अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी शाबासकी दिली.

पालकमंत्री गिरीश महाजन, परिक्षेत्र महानिरीक्षक विनोय चौबे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपआयुक्त एन. अंबिका, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, अविनाश बारगळ, सहायक आयुक्त अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण, रवींद्र वाडेकर, निरीक्षक हेमंत सावंत यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

तीन पोलिस ठाण्यांना मिळणार जागा
नाशिक शहरातील आडगाव, म्हसरूळ आणि उपनगर या पोलिस ठाण्यांसाठी जागांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. म्हसरूळ मेरीच्या, आडगाव बीएसएनएलच्या, तर उपनगर मनपा शाळेच्या जागेत सुरू आहे. पोलिस ठाण्यांसाठी शासकीय जागेचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, लवकरच या प्रस्तावास मंजुरी मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. लवकरच तीन पोलिस ठाणी त्यांच्या हक्काच्या जागेत सुरू होणार असल्याने पोलिस प्रशासनास दिलासा मिळाला.

कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे प्रक्रिया लवकरच
शहरात कायम स्वरूपी सीसीटीव्हीचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाने गृह मंत्रालयात पाठवला होता. तेथे मंजुरी मिळून वित्त मंत्रालयात पाठपुरावा सुरू होता. सीसीटीव्हीसाठी लागणारा निधी उपलब्ध झाला असून, काही दिवसांपूर्वीच हा प्रस्ताव मंजूर झाल्याने शहरात लवकरच सीसी कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.