आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी अगाेदर फटकारले, नंतर गोंजारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जलयुक्त शिवाराच्या बाबतीत धुळे अाणि नंदुरबार जिल्हा विभागातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बराचसा मागे असल्याची गंभीर बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या विभागीय बैठकीत पुढे अाली. धुळे अाणि नंदुरबार जिल्हा पहिल्याच टप्प्यात का अडकला, असा सवाल करीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. बैठकीदरम्यान कामांची, विविध योजनांची स्थिती समाधानकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर समारोपाच्या भाषणात अधिकाऱ्यांना गोंजारत उमेदीने कामे करण्यास प्रोत्साहित केले. जलयुक्त शिवार कामांच्या बाबतीत नाशिक विभाग अव्वल असल्याचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्र्यांनी दिले.

महाराष्ट्र अाराेग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात जलयुक्त शिवाराची विभागीय अाढावा बैठक घेण्यात अाली हाेती. बैठकीच्या प्रारंभी जे जिल्हे मागे पडले अाहेत, त्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात अाला. विशेषत: धुळे अाणि नंदुरबार जिल्ह्यातील कामे झालेली नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. या दाेन्ही जिल्ह्यांचे क्षेत्र, भाैगाेलिक रचना, अाणि तांत्रिक अडचणी सांगत अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांंनी संबंधितांना धारेवर धरत कामे रखडण्यास निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचे सांगत कानउघाडणी केली. सिंचन विहिरींच्या बाबतीत मागे पडलेल्या सिन्नर, निफाड अाणि कळवण तालुक्यातील कामे डिसेंबर अखेर कामे सर्वत्र पूर्ण करण्याचे अादेश यावेळी दिले. समाराेपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाच्या योजना समाजाच्या विकासासाठी आहेत. समाजातील सर्वात शेवटच्या घटकाच्या विकासाचे ध्येय ठेवत अंमलबजावणी करावी. सभागृहातील मूठभर लोकांना सव्वाकोटी लोकांचे भाग्य बदलण्याची संधी मिळाली असल्याने कामे प्रामाणिकपणे करत तिचे सोने करावे. असे अावाहन करीत झालेली चूक प्रसंगी पदरातही घेण्याचे सांगितले. बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अपूर्व हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, जे. पी. गावित, महसूलचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पाणीपुरवठ्याचे प्रधान सचिव राजेश कुमार, श्यामलाल गोयल, सुरेंद्रकुमार बागडे, बिपीनकुमार श्रीमाळी, असीमकुमार गुप्ता, संभाजीराव कडू-पाटील, पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले उपस्थित होते.

तीन महिन्यांनी बैठक; अधिकाऱ्यांचा सत्कार
प्रशासनाला जनतेचे भाग्य बदलण्याची शक्ती राज्यघटनेने दिली आहे. त्याचा उपयोग करून जनतेची कामे करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन योजनांचा आढावा घेण्यात येणार असून, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

पुढच्या बैठकीवेळी तरी याेग्य प्रगती सांगावी
नाशिक विभागात समाधानकारक स्थिती असली तरीही अकार्यक्षमता आणि अडचणी या दोन्हीमुळे कामे मागे राहिली आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांनी होणाऱ्या आढाव्याप्रसंगी आताच्या मागे असलेल्यांनी स्वत: उभे राहून आपल्या कामांमध्ये झालेल्या सुधारणेची माहिती सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.
बातम्या आणखी आहेत...