आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Wife Purchasing Lakhs Ruppes Paithani Sarri

मुख्‍यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींची पैठणी खरेदी लाखांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या होममिनिस्टर अर्थात सौभाग्यवतींनी येवल्यात दोन दिवस केलेल्या पैठणी साड्यांच्या मनसोक्त खरेदीवर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पुढील महिन्यात चव्हाण यांच्या मुलीचा विवाह समारंभ असून, त्यासाठी पैठणीचा हा बस्ता बांधला गेल्याची चर्चा आहे. याबाबत तूर्तास गोपनीयता पाळली जात असली, तरी आता हा मुद्दा विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनला आहे.

मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारकिर्दीतील बहुतांशी दिवस दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून व्यतित झाले आहेत. तसेच, त्यांचे शिक्षण विदेशात झाले असल्याने देश-विदेशातील अनेक आप्तस्वकीय व मित्रपरिवार या समारंभाकरिता येणार असल्याने त्यांना महाराष्ट्राचे राजवस्त्र असणार्‍या पैठणी साड्यांची भेट देण्यासाठी ही काही लाखांची खरेदी करण्यात आल्याची चर्चा आहे.


मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण शुक्रवारी येवल्यात डेरेदाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी शहरातील पैठणी विक्रीच्या तीन प्रमुख दालनांना भेटी देत दोन दिवसांत तब्बल साडेनऊ तास निव्वळ पैठणी निवडण्यात घालविले. या साडेनऊ तासांत किमान अडीचशे ते तीनशे पैठणी साड्या त्यांनी खरेदी केल्याची चर्चा आहे. प्रचंड गोपनीयता आणि दुकानदारांनाही काहीही न बोलण्याची तंबी दिली गेली असल्याने त्यांनी नेमक्या किती साड्या खरेदी केल्या, याबाबत कोणीही काहीएक बोलण्यास तयार नाही. मात्र, चव्हाण यांच्या गाड्यांच्या ताफ्यात असलेल्या दोन गाड्या केवळ साड्यांच्या बॅगाच ठेवण्यासाठी वापरण्यात आल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले.

20 बॅगांमध्ये 300 साड्या : साड्यांच्या दालनातून एका मोठय़ा बॅगेत किमान वीस साड्या ठेवल्या जातात. 15 ते 20 बॅगांचा हिशेब केल्यास किमान 250-300 साड्या यात असल्याचे जाणकारांचे मत आहे. येवल्यातील ज्या दालनांना चव्हाण यांनी भेट दिली तेथे पैठणीवर प्रक्रिया करून बनविण्यात येणारे ड्रेस मटेरिअल्स, पैठणी साड्या, मानपानाच्या महागड्या साड्या मिळतात. अनेक नेते, अभिनेते आणि मंत्र्यांच्या घरच्या शाही सोहळ्यांकरिता याच दालनांमधून यापूर्वी खरेदी झालेली आहे.

येवल्यालाच पसंती का? : येवला हे पैठणीचे माहेरघर असून, येथील हजारो लोक पैठणी विणण्याचा व्यवसाय करतात. पुण्या-मुंबईत दहा-दहा हजारांपासून मिळणारी पैठणी साडी येवल्यात खूप कमी भावात मिळते. त्यामुळेच या शहरांतून ज्यांना मोठय़ा प्रमाणावर साड्या खरेदी करायच्या आहेत, ते थेट येवला गाठतात.

साड्यांचे गणित असे : कमीत कमी किमतीची पैठणी साडी चार हजार रुपयांपासून, तर 10, 15, 20, 25, 50, 60, 75 हजारांपासून अडीच-तीन लाखांपर्यंत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या लग्नाला किमान 25 हजार रुपये किमतीच्या साड्या आणि 15 हजार रुपये किमतीच्या ड्रेस मटेरिअल्सची खरेदी झाल्याची चर्चा आहे. 300 साड्यांच्या खरेदीपोटी किमान एक कोटी रुपयांच्या आसपास खरेदी केली असावी, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणतात विरोधक


आणखी किती भोगावे?

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून, ‘पाणी नाही तर धरणात लघवी करू का?’ यासारख्या शिवराळ शब्दांत टर उडविली जात आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून येवल्यात लाखो रुपयांची पैठणी खरेदी सुरू आहे. संवेदनाहीन अशा या राज्यकर्त्यांची ही दोन्ही उदाहरणे पाहिली तर महाराष्ट्राच्या जनतेने आणखी किती भोगावे? असा सवाल समाजाच्या सर्व स्तरातून केला जात आहे. आमदार वसंत गिते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

जनतेची क्रूर चेष्टा
मुख्यमंत्र्यांचे कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी, मुले इतकेच र्मयादित नाही, तर राज्यातील संपूर्ण जनता हे त्यांचे कुटुंब आहे. एका बाजूला ही जनता दुष्काळाच्या झळा सोसत असताना मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारची खरेदी करणे ही राज्यातील जनतेची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल. अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना
राजा तुपाशी, जनता उपाशी

ही साड्यांची खरेदी म्हणजे, राजा तुपाशी आणि जनता उपाशी अशी स्थिती आहे. आपण इतक्या भीषण स्थितीचा सामना करीत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. जयंत दिंडे, ग्रामीण जिल्हाप्रमुख, शिवसेना.

आत्मपरीक्षणाची गरज
मुख्यमंत्री आणि राज्य शासन एका बाजूला दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करीत असताना, दुसरीकडे स्वत: असे वागत असतील तर राज्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे. सतीश कुलकर्णी, उपमहापौर, नाशिक

सामाजिक भानाची गरज
दुष्काळात जनता होरपळत असताना मुख्यमंत्र्यांसारख्या सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या इतक्या मोठय़ा पदावरील व्यक्तीनं काही सामाजिक भान पाळणं गरजेचं आहे. लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष