आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपण चालले गुन्ह्यात, 16 ते 18 वयोगटातील सर्वाधिक मुले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून उपाययोजना करून गुन्हेगारांवर अंकुश आणला जात असतानाच बालगुन्हेगारांच्या संख्येत वाढ होत असल्याने यंत्रणेसह समाजातही चिंता व्यक्त होत

केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये असणारे बालगुन्हेगारांचे लोण आता नाशिक शहर व ग्रामीण भागातही पसरत असल्याचे पोलिस दप्तरी दाखल होत असलेल्या गुन्ह्यांच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षभरात नाशिक पोलिस आयुक्तालयातील 11 पोलिस ठाण्यांमध्ये भारतीय दंड विधान संहितेनुसार तब्बल 242 बालगुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 94 गुन्हे चोरीचे व त्यापाठोपाठ 42 घरफोडीचे आणि जबरीलुटीचे 17, खूनाचे 9, खूनाचा प्रयत्न 1, फूस लावून पळवून नेल्याचे 3, दंग्याचे 14, दुखापतीच्या 27 व छेडछाडीचे 2 व इतर प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये 21 जणांचा समावेश आहे. तर 2011 मध्ये एकूण 182 बालगुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल असून यामध्ये बलात्कार व विनयभंगाचे 6 आणि खूनाचे 7 गुन्हे व चोरी, घरफोड्यांचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत.

हे आहेत गुन्हे
पाकीटमारी, वाहनेचोरी, भुरट्या चोरीपुरता र्मयादित असणार्‍या बालगुन्हेगारांकडून जबरीलूट, घरफोड्या, खून, दंगलीसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही सक्रिय सहभाग .

संवादाचा अभाव
पालक-मुलांमध्ये निर्माण होत असलेला संवादाचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा अवास्तव वापर मुलांकडून होत असल्यामुळेच गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ व पोलिसांकडून सांगितले जात आहे.

महाराष्ट्र सर्वात पुढे
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रातील बालगुन्हेगारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सोळावे वर्ष धोक्याचे
2011 व 2012 मध्ये बालगुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या एकूण 424 गुन्ह्यांमध्ये संशयितांचे वयोगट लक्षात घेतले असता सर्वाधिक 16 ते 18 वर्षवयोगटातील तब्बल 269 बालगुन्हेगारांचा समावेश आहे. यावरून 16 वर्ष धोक्याचे असल्याचे दिसत असून या वयोगटातील मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे पेालिस सांगतात. 7 ते 12 वर्षवयोगटातील 18 आणि 12 ते 16 वर्षवयोगटातील 137 बालगुन्हेगार समाविष्ट आहे.

घटना घडल्यावर जाग
पालकांचा मुलांशी संवाद होत नाही. अनेक वेळा गुन्हा घडल्यावर त्यांना जाग येते. मित्र कोण हेदेखील त्यांना माहिती नसते. मोबाइल, इंटरनेटच्या वापराचाही अधिक परिणाम झाला आहे.
-डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस उपायुक्त

नीतिमूल्येच बदलली
बदललेली जीवनशैली व पालकांच्या नीतिमूल्यांतील बदल हे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर प्रत्येकामध्ये स्वार्थाचे प्रमाण वाढीस लागले आहे. माध्यमांमधील अनुकरण करावे असे वाटते. यामुळे गुन्हेगारी वाढते.
-प्रा. अर्चना गटकळ, मानसशास्त्र, अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालय