आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Children Even Not See School, Examination Around The Corner

परीक्षा तोंडावर, मुलांनी शाळेचे तोंडच नाही पाहिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आदिवासी भागातील मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी नाशिक शहरात आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते महिन्यापूर्वीच राज्यस्तरीय क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात आली. प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य तर नाहीच. परंतु, त्या विद्यार्थ्यांचा मेरी येथील शाळेत प्रवेश होऊन महिना उलटला तरी अद्याप त्यांना शाळेचे तोंड पाहावयास मिळाले नाही. मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळासह शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. या मुलांना किडलेल्या भाज्या तसेच कच्च्या पोळ्या खाव्या लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नाशिक शहरात आग्रा महामार्गावर अमृतधाम परिसरात आदिवासी मुलांसाठी राज्यस्तरीयक्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात आली आहे. त्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मुले आणि मुली राहतात. विशेष मुले आणि मुली एकाच वसतिगृहात राहात असून, केवळ रूम वेगळ्या आहेत. या मुलांना त्यांच्या क्रीडा प्रकारांच्या सरावासाठी साहित्य नाही. या शैक्षणिक वर्षापासून या मुलांना सीडीओ मेरी येथील शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. परंतु, बसची सुविधा नसल्याने या मुलांनी एकदाही शाळेचे तोंड पाहिलेले नाही. काही दिवसांवर सहामाही परीक्षा आली असून, अद्याप या मुलांना बस उपलब्ध झालेली नाही. प्रबाेधिनीत ही मुले खो-खो, धावणे, लांब उडी या खेळांचा सराव करतात. त्यांना उद‌्घाटनाच्या दिवशी फक्त ट्रॅकसूटच देण्यात आला होता. त्यानंतर या मुलांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. लांब उडीच्या सरावासाठी मातीचा ट्रॅक नाही. मोठ्या अपेक्षेने मुलांना पालकांनी प्रबोधिनीत खेळण्यासाठी, सराव आणि शिक्षणासाठी पाठविले होते. मात्र, उद्देश सफल होऊ शकलेला नाही.

..तर अधिकाऱ्यांना देऊ खेळणी भेट
क्रीडा प्रबोधिनीमधील मुलांना खेळापासूनच नव्हे, तर शिक्षणापासूनही वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही आदिवासी विद्यार्थ्यांना ‘अच्छे दिन’ कधीच येणार नाहीत, असे चित्र आहे. लवकरात लवकर मुलांना बस, चांगल्या दर्जाचे जेवण आणि खेळण्याचे साहित्य द्यावे, अन्यथा प्रत्येक अधिकाऱ्यांना बाजारातील खेळणी भेट देण्यात येतील. -लकी जाधव, विभागीय अध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी परिषद

बसची सुविधा लवकरच देणार
क्रीडाप्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसेसची फाइल मंजुरीसाठी पाठविली आहे. मात्र, अद्याप ती मंजूर झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर या मुला-मुलींना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी