आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको, इंदिरानगर झाले गुंडगिरीचे आगर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - सिडको, इंदिरानगर परिसरात वाढणारी गुंडगिरी नागरिक व पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. सुमारे साडेसहा लाख लोकसंख्येसाठी केवळ पावणेदोनशेच्या आसपास असलेले पोलिसबळ कमी पडत असल्यामुळेच गुंडगिरी वाढत असल्याचा एक निष्कर्ष समोर येत आहे. प्रचंड विस्तार असलेल्या या परिसरासाठी केवळ दोन पोलिस ठाणी व त्यांच्या जोडीला बोटावर मोजण्याइतपत पोलिस चौक्या आहेत. यावर तातडीने कृती करण्याची वेळ आली असल्याचे ट्रक जाळण्याच्या ताज्या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाहने जाळणे, सोनसाखळी चोरी, पोलिस असल्याचे सांगून लूटमार, घरफोड्या, भुरट्या चो-या व इतर प्रकारे दहशत पसरवण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक घटनांप्रकरणी गुंडांना पोलिस तेवढ्यापुरते ताब्यात घेतात. मात्र, लवकरच ते सुटतात व पुन्हा गुन्हे करण्यासाठी
मोकळे होतात.
टिप्पर गँगची दहशत - सिडकोत टिप्पर गँगची तर प्रचंड दहशत आहे. यातील काही पोलिसांच्या ताब्यात आहेतही. मात्र, त्यांचेच काही साथीदार मोकाट असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. त्यांची दहशत एवढी की कुणी विरोधात तक्रार करण्याची हिंमतही करीत नाही. हे गुंड आधी राजरत्ननगर, नंतर उपेंद्रनगर व आता पवननगर भागात रात्रीच्या व इतरही वेळी घोळक्याने जमून दहशत पसरवतात. सिडकोतील बहुतेक गुन्ह्यांमध्ये यांचाच हात असतो.
पोलिस प्रशासन टार्गेट - नागरिकांचा रोष पोलिसांनाच झेलावा लागतो. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्यही खचत असल्याचे निदर्शनास येत आहे. मोजके कर्मचारी आणि त्यात अनेक पोलिसांची कामाची सतत बदलणारी वेळ. काही रात्रपाळीसाठी, काही दिवसपाळीसाठी तर काही इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी ठाण्याच्या हद्दीबाहेर गेलेले असतात.
गस्त व नाकाबंदी देखावाच - पोलिसांची गस्त व नाकाबंदी केवळ देखावा असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. गस्तीसाठी पोलिस व्हॅन मुख्य रस्त्यानेच फिरतात. गल्लीबोळात त्यांचे लक्षही जात नाही. पोलिसांची गाडी येत असल्याचे कळताच गुंड फरार होतात.
नाकाबंदीत केवळ दुचाकीचालकांनाच अडविले जाते. ब-याचदा ही मंडळी नोकरीहून परतणारी, प्रवासाहून आलेलीच असतात. मात्र, पोलिसांसमोरून खच्चून प्रवासी नेणारे रिक्षाचालक पोलिसदादांना रामराम करीत रुबाबात निघून जातात.