आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआयएसएफ भरतीत हालअपेष्टा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - पिण्याचे पाणी नाही, झाेपायला जागा नाही, अशा परिस्थितीत विषारी किड्यांची भीती बाळगता रस्त्यावर अर्धवट झाेपेत केंद्रीय आैद्याेगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ‘शिपाई’ पदाच्या भरतीत उमेदवार भाग घेत आहेत. ही स्थिती आहे राज्यभरातून या भरतीसाठी येणार्‍या तरुणांची!

केंद्रीय आैद्याेगिक सुरक्षा दलाच्या अनिश्चित जागांसाठी शिपाईपदासाठी नेहरूनगर कामगार वसाहतीतील मुख्यालयात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दहावी पास उमेदवारांसाठी खुल्या असलेल्या शिपाई फेअरपदासाठी महाराष्ट्रातून १० हजार ५५० उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. भरती प्रक्रियेस २७ एप्रिल राेजी सुरुवात झाली असून, १४ मे पर्यंत ही भरती सुरू आहे. दरराेज ७०० उमेदवारांची शारीरिक क्षमतेची चाचणी यात घेतली जाते.

सकाळी वाजेपासून प्रक्रियेला सुरुवात हाेत असल्याने परजिल्ह्यातील उमेदवार रात्रीच प्रक्रियेस्थळी उपस्थित हाेतात. मात्र या ठिकाणी येणार्‍या उमेदवारांसाठी कुठल्याच साेयीसुविधा उपलब्ध नाहीत. रात्रीच्या अंधारात येणार्‍या उमेदवारांना पिण्यासाठी पाणी नसल्याने रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या रहिवाशांना उठवून पाण्याची तहान भागवावी लागत आहे. झाेपण्यासाठी जागा नसल्याने करन्सी नाेट प्रेस कामगारांच्या सायकल स्टॅण्ड, नेहरूनगरातील कारंजा, आजूबाजूची झाडी माेकळ्या जागेत उमेदवार डासांच्या उच्छादात रात्र कशीबशी काढतात. त्यानंतर सकाळी चाचणीला ते सामाेरे जातात.
सेंट झेव्हिअर्ससमाेरील नेहरूनगर गेट जवळून उमेदवारांची धावण्याची स्पर्धा घेतली जाते. रस्त्यावर अगणित लहान-माेठे खड्डे पार करीत डांबरी रस्त्यांवरून उमेदवारांना परीक्षा द्यावी लागत आहे.

उपाशी पाेटी सोसतात रणरणते ऊन
इतरचाचणी परीक्षा पूर्ण हाेईपर्यंत उमेदवारांना रणरणत्या उन्हात उपाशीपाेटी दुपार काढावी लागत आहे. केंद्रीय आैद्याेगिक सुरक्षा दलामधील भरतीप्रक्रिया पारदर्शक असली तरी, देशभरातून इथे विविध चाचण्या देण्यासाठी येणार्‍या उमेदवारांना तहान सहन करण्याची आणि रात्र अर्धवट झोपेत आणि विषारी कीटकांच्या धोक्याचा सामना करण्याची चाचणी देखील द्यावी लागते, अशी स्थिती आहे. उमेदवारांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.