आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुभाजक देतोय मृत्यूला निमंत्रण, वडाळा-पाथर्डी रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वडाळा-पाथर्डी या रस्त्याचे काम सध्या सुरू असले तरी नागरिकांच्या सुरक्षेला कोणतेही प्राधान्य दिले जात नसल्याने हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. कलानगर चौक ते गुरू गोविंदसिंग कॉलेजपर्यंत सध्या दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, दोन्हीही बाजूला वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही माहिती फलक लावण्यात आलेले नाही. तर, चर्चजवळ रस्त्यामध्येच ड्रेनेजचे चेंबर बाहेर आल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर साचलेली माती, बारीक कच, रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी राहात असल्याने हा रस्ता अरुंद झाला असून, अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत.
वडाळा-पाथर्डी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. रुंदीकरणाचे बहुंताश काम पूर्ण झाले असून, आता दुभाजकाचे काम सुरू आहे. श्रद्धा विहार कॉलनी परिसरात शाळा व महाविद्यालयाचा परिसर असल्याने या ठिकाणी रस्ता ओलांडण्याची सुविधा निर्माण करण्याची गरज असताना तशी सुविधा न ठेवल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी दुभाजकाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करून दुभाजक टाकताना पंक्चर ठेवण्याची गरज आहे.
नियोजनच नाही
या रस्त्यावर शैक्षणिक संस्था येत असल्याने दुभाजक टाकताना ठिकठिकाणी रस्ता ओलांडण्याची सुविधा ठेवली पाहिजे. परंतु, येथे नियोजन नसल्याने अडचणी येणार आहे. यासंदर्भात शनिवारी पालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींची माहिती दिली जाणार आहे. वंदना बिरारी, नगरसेविका
योग्य की अयोग्य?
दुभाजकामधील अंतर जास्त असल्याने रस्ता अरुंद होऊ शकतो. त्यामुळे दुभाजकाचे अंतर तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे की नाही? यावरच नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, त्र्यंबकरोडवर याच पद्धतीचे दुभाजक टाकण्यात येत असले तरी त्या ठिकाणचे अंतर कमी आहे. त्या तुलनेत वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक भविष्याच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकतात.
रुंदीकरणानंतर काम
कलानगर चौक ते गुरू गोविंदसिंग रस्ता हा ३० मीटरचा असून, दोन्ही बाजूला १३-१३ मीटरचा रस्ता असेल. तर, दोन मीटर पाथवे असणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरच दुभाजकाचे काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास दिल्या असून, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन सध्या काम बंद आहे. संजय चव्हाण, नगरसेवक