आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizen Complaint Of Civil Problems On City Mayor

‘साहेब, आम्हीही माणसंच आहोत, इकडंही लक्ष द्या’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘साहेब, आम्हीही माणसे आहोत. आमच्याकडेही या, आम्हीही तुम्हाला मतदान करतो,’.अचानक आलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या आवाजामुळे मातंगवाडा टाळून भद्रकाली टॅक्सी स्टॅण्डकडे जाणार्‍या महापौरांसह अन्य प्रतिनिधी-अधिकार्‍यांना तिकडे वळावे लागले. एक नगरसेवक, ‘आम्ही तुमच्यासाठी विकासकामे करीतच असतो, ठराव दिले आहेत’, असे म्हणताच, महिलांनी एका आवाजात ‘भाऊ, तुम्ही गप्प बसा, या घाणीत आम्ही कसे जगतो, ते आम्हालाच माहीत’, असे सुनावत महापौरांना गराडा घातला.

महापौर अँड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, नगरसेवक विनायक पांडे व पश्चिम प्रभाग सभापती माधुरी जाधव यांनी शनिवारी सकाळी ‘महापौर तुमच्या दारी’अंतर्गत दौर्‍यास प्रारंभ केला. दौर्‍याआधीच्या स्वच्छतेकडे लक्ष वेधून नागरिकांनी ‘दौर्‍यासाठीच झालेली अशी स्वच्छता रोज व्हावी,’ अशी मागणी केली. ‘आमच्या नगरसेविका सभापती झाल्याने कामे होतील, असे वाटले होते; मात्र काही झाले नाही,’ अशा शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नंतर पिंपळचौकातील अवैध व्यवसायांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली.

महिलेची जनहितार्थ तक्रार

साक्षी गणेश मंदिरासमोर एका महिलेने पाण्यासंदर्भात बोलणे सुरू केल्यावर त्यांच्याकडे पाणी येत नसेल किंवा तत्सम तक्रार असावी, असेच सगळ्यांना वाटले. मात्र, सगळीकडे पाण्याची ओरड असताना सराफ बाजारात 24 तास पाणी कसे चालू राहते? असा सवाल महिलेने केल्याने सर्वांनाच या जनहितार्थ तक्रारीचे कौतुक वाटले.

रोज सफाईच होत नाही

सर्व लवाजमा सिंधी मार्केट भागात गेल्यावर व्यापार्‍यांनी मोठे मार्केट बांधून देण्याची मागणी केली. भद्रकाली भाजी मार्केटनजीकच्या नागरिकांनी परिसरात रोज सफाईच होत नसल्याचे सांगितले. मोकाट जनावरांचा प्रश्नदेखील बिकट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दौर्‍याआधी सफाई

महापौरांचा दौरा होणार असल्याची कल्पना प्रशासनाला असल्याने सकाळपासूनच पंचशीलनगर भागात सफाई कर्मचारी दाखल झाले होते. औषध फवारणी मोहीम, जंतुनाशक पावडर फवारणी सुरू होऊन मोकाट कुत्री पकडण्यासाठी श्वानपथकदेखील कामाला लागले होते.

तर मतदानच करणार नाही

महापौर भद्रकालीतील टॅक्सी स्टॅण्डजवळ पोहोचल्यावर ‘साहेब, मागच्या महिन्यात गोरगरिबांच्या टपर्‍या या खड्डय़ात पडल्या तरी तुम्ही आला नाहीत. निवडणुकीला वर्ष झाले तरी कुणीच या भागात आले नाही. आता तुम्हाला सांगितल्यानंतरही समस्या सुटल्या नाहीत तर मतदानच करणार नाही,’ असा इशारा नागरिकांनी दिला.

माजी महापौरांच्या प्रभागात तक्रारींचा पाढा
पश्चिम प्रभाग सभापती माधुरी जाधव व माजी महापौर विनायक पांडे यांच्या प्रभाग 25 च्या पंचशीलनगर व भद्रकाली परिसरातील सार्वजनिक शौचालये, गटारी यांची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसत आहे. भद्रकाली परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या फिल्ट्रेशन प्लांटचे काम कित्येक दिवसांपासून बंद असल्याने परिसरात डांसाचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या घराच्या भिंतींना लागून असलेल्या गटारी तुडुंब भरल्या आहेत. पाण्याचा निचराच होत नसल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण भद्रकाली परिसरात दिसून आले. शिवाय, अनेक गटारी फुटल्या असल्याने, गटारीतून घरांमध्ये काही नळांच्या पाइपलाइन गेल्या असल्याने अनेक वेळा दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे या वेळी नागरिकांनी सांगितले.