आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाचे ‘नागरिकस्नेही पोलिसिंग’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी किंबहुना ती कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नागरिकस्नेही पोलिसिंग सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचे राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलिस आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. पोलिस मित्र, प्रतिसाद अॅपबाबत नागरिकांना पोलिस अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक आणि पोलिसांमधील अंतर कमी होऊन नागरिकांकडून पोलिसांना सहकार्य मिळण्याची अपेक्षा पोलिस प्रसासनाकडून व्यक्त होत आहे.
शहरात वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आणि पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलिस आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. या गर्भित इशाऱ्यानंतर पोलिस आयुक्तांनी सर्व सूत्रे हाती घेत शहरात कोम्बिंग, ऑलआउट, नाकेबंदी आणि टवाळखोरांसह गुन्हेगार चेकिंग मोहीम सुरू केली. वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांवर होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करत पोलिस आयुक्तांनी पोलिस अधिकाऱ्यांना धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. कारवाईमुळे गुन्हेगार सैरभैर होत असताना शहरात अंबड, हनुमानवाडी आणि पंचवटी महाविद्यालयासमोर गोळीबाराच्या घटना घडल्या. एका घटनेत तडीपार गुंडाचा खून झाला, तर दुसऱ्या घटनेत मुलीच्या वादातून तरुणाचा खून झाला. तिसऱ्या घटनेत एका बांधकाम व्यावसायिकास दोन दिवसांत धमाका करण्याची धमकी दिली. या घटना का घडतात, यावर पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये नागरिकांशी वाढलेला दुरावा हे मुख्य कारण असल्याचे जाणवले. खबऱ्यांचे नेटवर्क विस्कळीत झाले असल्याने शहरात गुंडांचा वावर वाढत आहे. शहरात घडणाऱ्या या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकस्नेही पोलिसिंग हाच एकमेव उपाय असल्याने पोलिस आता थेट नागरिकांशी संपर्क साधून परिसरातील घडामोडी जाणून घेणार आहेत. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, अतुल झेंडे अादी अधिकारी थेट नागरिकांशी संपर्क साधत आहेत.

पाेलिस अधिकाऱ्यांचा नागरिकांशी थेट संवाद
पोलिसमित्र बनवणे, नागरिक, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रतिसाद अॅपचे फायदे सांगणे, शाळा-महाविद्यालय, क्लासेस आणि कंपनीच्या ठिकाणी पोलिस अधिकारी नागरिकांसह तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेजारी खरा पहारेकरी, चौक बैठका, गल्ली, मोहल्ला बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. बांधकाम, हॉटेल आणि इतर व्यावसायिकांशी पोलिस अधिकारी थेट संवाद साधून सुरक्षेसाठी कशा उपाययोजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करत आहे.

सहकार्य अपेक्षित
^गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचे पोलिस प्रशासनास सहकार्य आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिक हा साध्या वेशातील पोलिस आहे. परिसरात घडणारे अनुचित प्रकार नागरिकांनी पोलिसांना कळवावे. - एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

अधिकारी सक्रिय
शहरातील सरकारवाडा, भद्रकाली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी हद्दीतील कॉलेज, क्लासेस येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रतिसाद अॅपची माहिती दिली. ‘पोलिस मित्र’ संकल्पनेची तरुणांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे, डॉ. सीताराम कोल्हे यांनी व्यावसायिकांसह शाळा, महाविद्यालयात मार्गदर्शन केले.
बातम्या आणखी आहेत...