आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका, वृक्षप्रेमींविरोधात नागरिकांनी केले आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चौपदरीकरणातील अडथळा आणि नागरिकांसाठी जीवघेणे ठरू पाहणाऱ्या रस्त्यांतील झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी करत दिंडोरीरोडवरील नागरिकांनी महापालिका वृक्षप्रेमी संघटनांविरोधात शुक्रवारी आंदोलन केले. या रस्त्यातील एका झाडावर दुचाकी आदळून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आंदोलन केले.
दिंडोरी रोडवर म्हसरूळ-पेठरोड वळणावर दुचाकी अादळून तीन तरुणांचा बळी गेला होता. अपघातानंतर ठेकेदाराने धोकेदायक झाडांलगत रिफ्लेक्टर लावले. मात्र, यापूर्वीच हे रिफ्लेक्टर लावले असते तर कदाचित तरुणांचा जीव वाचला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला होता, त्याच ठिकाणी नागरिकांनी आंदोलनातून महापालिका वृक्षप्रेमी संघटनांचा निषेध केला. तसेच, अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची जबाबदारी या संघटनांनी उचलण्याची मागणीही नागरिकांनी केली.
या रस्त्यावरील धोकेदायक झाडे तोडण्यास शहरातील वृक्षप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. तसेच, काहींनी वृक्षतोडीविरोधात याचिका दाखल केली आहे. महापालिका प्रशासनाने चौपदरीकरणास सुरवात केली. मात्र, झाडे तसेच ठेवून डांबरीकरण करण्यात आले. अनेक झाडे ही रस्त्याच्या मध्यभागी आहेत. पालिकेने ती तोडून रस्ता सुरक्षित करण्याची मागणीही नागरिकांनी यावेळी केली. कायदेशीर सल्ला घेऊन वृक्षप्रेमी संघटनांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. माजी सभापती तथा नगरसेविका शालिनी पवार, रंजना भानसी, नगरसेवक गणेश चव्हाण यांच्यासह म्हसरूळ-दिंडोरीरोड परिसरातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
धोकेदायक झाडांचा रस्ता
दिंडोरीरोड सर्वाधिक धोकेदायक झाडांचा रस्ता बनला आहे. आरटीओ कॉर्नर ते आरोग्य विज्ञान विद्यापीठापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी तब्बल ३६ झाडे आहेत.
वृक्षप्रेमींनी खर्च उचलावा
- अपघातात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांचा खर्च या शहरातील वृक्षप्रेमी संघटनांनी उचलावा. यापुढे कधी या झाडांच्या कारणामुळे अपघात झाल्यास मृतदेह याचिकाकर्त्यांच्या घरी नेला जाईल.
गणेश चव्हाण, नगरसेवक, प्रभाग
नागरिकांचा उद्रेक होतोय
- परिसरातील नागरिकांसह इतर वाहनांसाठी हा रस्ता दिवसेंदिवस धोकेदायक बनतो आहे. अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर ते कुटुंब रस्त्यावर येते. वृक्षप्रेमींनी ही बाब लक्षात घ्यावी.
अरुण पवार, माजी नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...