आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizens Toylat For Bathroom On Additional Commissioner

नागरिकांनी ठेवले अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलवर टमरेल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; एकीकडे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेत तळाकडील समस्यांबाबत जागृती करणारे आंदोलन शुक्रवारी चर्चेचा विषय ठरले. गौतमनगर येथे सार्वजनिक शौचालयाची वारंवार मागणी करूनही ते होत नसल्यामुळे अखेर मार्शल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रवेशद्वारावर एक तास निदर्शने करून चक्क अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलवरच टमरेल नेऊन ठेवले.

शहरात सार्वजनिक शौचालयांचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजत असून, निधीअभावी शाैचालये होत नसल्याचीही नगरसेवकांची ओरड आहे. मध्यंतरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करून उघड्यावर शौचास जाणाऱ्या पाच हजार कुटुंबांचा शोध लावला गेला. या कुटुंबांना वैयक्तिक शौचालये देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

दरम्यान, गौतमनगर भागात वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक शौचालयाची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी हातात टमरेल घेऊन निदर्शने केली. अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांची भेट घेऊन तत्काळ शौचालय बांधण्याची मागणीही केली. स्मार्ट सिटीचा विचार करण्यापूर्वी शहरातील समस्यांचा अभ्यास करा, अशी मागणीही यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली. या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. निदर्शनांवेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडला नाही.

सार्वजनिक शौचालयप्रश्नी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलवर टमरेल ठेवून जाब विचारताना गौतमनगरवासी.