आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक प्रशासक मुकणे यांची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अवघ्या सहा महिन्यांच्या काळातच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक ज्ञानेश्वर मुकणे यांची तडकाफडकी बीड जिल्हा बँकेत प्रशासक म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आदिवासी विकास आयुक्तालयातील अपर निबंधक ए. के. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयवंत जाधव, तसेच बँकेचे संचालक तथा आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार देवीदास पिंगळे अशा विविध नेत्यांनी जिल्हा बँकेतील भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत सहकारमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. बँकेच्या कारभाराची दोन वेळा चौकशीही करण्यात आली. चौकशीत गंभीर अनियमितता आढळल्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून 23 मे 2013 रोजी ज्ञानेश्वर मुकणे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुकणे यांनी थकबाकीदारांच्या याद्या ग्रामीण भागात लावण्यापासून, तर संचालकांकडील कर्जवसुलीसाठीही दबाव झुगारून प्रयत्न केले. थकबाकीदार संचालकांना नोटिसा दिल्यामुळे वादही निर्माण झाला होता. दरम्यान, कर्मचारी संघटनांबरोबरही मुकणे यांचे वसुलीवरून मतभेद निर्माण झाले होते. त्यावरून कर्मचारी संघटनांनी थेट सहकार आयुक्तांकडे तक्रार करून मुकणे यांची महिनाभरात बदली न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही दिल्याचे वृत्त होते. मध्यंतरी नाशिक जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीचा पॅटर्न समजून सांगण्यासाठी बीड जिल्हा बँकेत मुकणे यांचे पथकही गेले होते.