आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्री बससेवेला परस्परच ‘ब्रेक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्वामी विवेकानंदनगर व परिसरातील चक्री बससेवा एसटी महामंडळाने महिनाभरापासून परस्पर बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार व आगारप्रमुखांना पत्र देऊनही उपयोग न झाल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान, दोन संघटनांच्या वादातून बस बंद झाली असल्याचे एका एसटी कर्मचार्‍याने सांगितले.

पंचवटी परिसरातील शेवटचा थांबा असलेल्या स्वामी विवेकानंदनगरसाठी नाशिकरोड आरटीओमार्गे स्वामी विवेकानंदनगर अशी चक्री बससेवा सुरू होती. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा सोयीस्कर होती. मात्र, महिनाभरापासून ही बससेवा बंद झाली असल्याने परिसरातील प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो आहे. त्यातही खासगी वाहने वेळेवर येत-जात नसल्याने नोकरदारांसह विद्यार्थ्यांना विलंबासह आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.

या भागात चक्री बससेवा सुरू करण्यासाठी आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासह आगारप्रमुख अजित पाठक यांना परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिले होते. ही बससेवा पूर्ववत न झाल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. पंचवटी परिसरात नववसाहतींची संख्या मोठी असतानाही, त्या प्रमाणात बससेवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. विशेष म्हणजे, काही वसाहतींना दशकभरापासून बसेसची प्रतीक्षा आहे.

...पण उपयोग नाही
चक्री बस बंद असल्याने रोज खासगी वाहनांना तिप्पट पैसे देऊन प्रवास करावा लागतो. कार्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. बस सुरू होण्यासाठी निवेदन देण्यात आले. मात्र, उपयोग झाला नाही. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. चंद्रकांत धाकड, नोकरदार

पासचा उपयोग काय?
शैक्षणिक पास काढूनदेखील उपयोग होत नाही. इतर बसने गेल्यास पुढे जाण्यासाठी दुसरी बस अथवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसतो. सनी मेढे, विद्यार्थी