नाशिक-एसटी महामंडळाने इंधन खर्च, वेतनभत्ते, साहित्य खरेदीमुळे वाढणारा तोटा कमी करण्यासाठी तीन महिन्यांत सलग दुसर्यांदा भाडेवाढ करीत प्रवाशांना दणका दिला आहे. यामध्ये शहर बससेवेअंतर्गत विविध मार्गांवरील सध्याच्या भाड्यात एक रुपयाने, तर मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवासदरात पाच ते सात रुपयांची वाढ केली आहे.
महामंडळाने मंगळवारी भाडेवाढ जाहीर केली असून, शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे. ग्रामीण मार्गावर उपटप्प्यांची सवलत पाच टप्प्यांपर्यंत म्हणजे 20 किलोमीटर अशी पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्यात आली आहे. यापूर्वीच्या सर्व प्रकारच्या नियमित असलेल्या सुविधा कायम ठेवण्यात आल्या आहेत. महामंडळाकडून उत्पन्नवाढीसाठी ‘प्रवासी वाढवा’ अभियान, तसेच इंधन बचतीसाठी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विभागीय स्तरावर अधिकारी-कर्मचार्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे त्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. महामंडळाकडून यापूर्वी 9 नोव्हेंबर 2013 रोजी सहा टक्के भाडेवाढ करण्यात आली असताना त्यापाठोपाठ आता पुन्हा दरवाढ करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.