आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील प्रमुख बस थांब्यांवर भरते जत्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील प्रमुख बसथांबे आणि स्थानकांवर विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी असतानाही बसेस इतरत्र लागत असल्याने त्यांच्यामागे पळावे लागते. याऐवजी प्रवाशांच्या शिस्तीने रांगा लागल्यास ही समस्या निश्चित सुटण्यास मदत होऊ शकते. यासाठी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या इच्छाशक्तीची खरी गरज आहे.

शहरातील बसस्थानकांवर शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी व इतर प्रवासी बसेसची प्रतीक्षा करीत असतात. या ठिकाणी महामंडळाकडून ज्याप्रमाणे यात्रोत्सवात विशेष नियोजन करून बॅरिकेडिंग केले जाते. प्रवाशांना रांगेतूनच बसेसमध्ये प्रवेश दिला जातो तसेच मुंबई, पुण्यात रांगा लावण्याची शिस्त आहे, त्याच धर्तीवर किमान प्रमुख बसस्थानक, थांब्यावर रांगा लागल्यास दुर्घटना कमी होतील.

मंगळवारची परिस्थिती
मेळा बसस्थानकात सायंकाळी 5.20 वाजता स्थानकातून त्र्यंबकेश्वरसह ओझरमिग, कसबे-सुकेणे, आडगाव, के. के. वाघ महाविद्यालय, भुजबळ नॉलेज सिटी, ब्रrा व्हॅली, महिरावणी, संदीप फाउंडेशन, मुंगसरा, मखमलाबाद मार्गावरील बसेस सुटतात. या स्थानकात बस आत येत असल्याचे दिसताच तिच्या मागे प्रवासी धावत सुटतात. बसचालक जशी बस फिरवेल त्या दिशेने विद्यार्थी बस थांबेपर्यंत पळत असल्याचे दिसून आले.

शालिमार चौकात सायंकाळी 5 वाजता आढावा घेतला असता शालिमार चौकात, द्वारका, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूर, सिन्नर फाटा, पांढुर्ली भागात जाणार्‍यांची गर्दी होते. बस वळण घेताच तिथपासून ते गंजमाळ सिग्नलच्या अलीकडे मनपाच्या शौचालयापर्यंत विद्यार्थी पळत सुटतात. बसचालक थांब्यावर बस न थांबविताच मिळेल तिथे रस्त्यातच बस उभी करतात.

रविवार कारंजावर 5 वाजून 50 मिनिटांनी पिकअप शेडवर विद्यार्थी बसची प्रतीक्षा करताना दिसून आले. मात्र, बसची वेळ जसजशी जवळ येते, तसे विद्यार्थी रस्त्यावर येऊ लागल्याने काही वेळातच शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी बाहेर उभे राहतात. या ठिकाणी अक्षरश: जत्रा भरल्याप्रमाणेच चित्र दिसून येते.

कर्मचारी नेमावे
महामंडळाने जुना सीबीएस, मेळा बसस्थानक भागात विद्यार्थ्यांच्या रांगा लावण्यासाठी नियमित कर्मचारी नियुक्त करावे. नागरिकांना आपोआप शिस्त लागेल. मुश्ताक बागवान, व्यावसायिक

स्वतंत्र फलाट
मेळा स्थानकात सायंकाळी 5 नंतर जादा बसेस आणि त्याही स्वतंत्र फलाटावरूनच सुटल्या पाहिजेत. त्यामुळे बसेसमागे धावण्याची गरज पडणार नाही. आपोआपच रांगा लागतील. पवन देवडे, विद्यार्थी

शिस्त हवीच
शालिमार, रविवार कारंजा चौकात प्रवाशांच्या रांगा लागल्यास विद्यार्थिनींची कुचंबणा होणार नाही. मुलांच्या दांडगाईमुळे मुलींना मागे थांबावे लागते. महामंडळाने योग्य ती उपाययोजना करावी. कांचन खाचणे, विद्यार्थिनी