आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराध्यक्षपदाच्या खुर्चीच्या शर्यतीत कोण जिंकले, कोण हरले?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कॉँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या रस्सीखेचीत अँड. आकाश छाजेड यांचा पराजय झाल्याचे चित्र रंगविले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचा पूर्ण झालेला कार्यकाळ व नूतन शहराध्यक्षही आपल्याच गटातील असल्याबाबत त्यांनी केलेला दावा बघता खुर्चीच्या शर्यतीत नेमके कोण जिंकले व कोण हरले, असा प्रश्न आता सामान्य कॉँग्रेसजनांना पडला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर शहराध्यक्षपदाची खांदेपालट झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहराध्यक्षपदावरून डॉ. शोभा बच्छाव यांची गच्छंती झाली. लोकशाही पद्धतीने शहराध्यक्ष निवडीसाठी कॉँग्रेस भवनात निरीक्षक दाखल झाले. त्यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील, शैलेश कुटे, केशव (अण्णा) पाटील, नितीन सुगंधी असे इच्छुकांचे पीक उगवले. पक्षांतर्गत उमेदवारीसाठी संदोपसुंदी सुरू झाल्याचे बघून आमदार जयप्रकाश छाजेड यांनी नवा डाव रचला. हळूच आपले पुत्र आकाश छाजेड यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करून दोन्ही गटांना धक्का दिला. त्यानंतर छाजेड विरोधात सर्वांनी आघाडी उघडली. हा गोंधळ बघून निरीक्षकांनी शहराध्यक्ष निवडीचा निर्णय प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात टोलवला. दिल्लीपासून ते प्रदेश कॉँग्रेसच्या नेत्यांशी असलेली जवळीक आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधाचा परिपाक म्हणून आकाश यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडली. त्यानंतर कॉँग्रेसमध्ये सरळसरळ छाजेड विरुद्ध इतर असा सामना रंगू लागला.

राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीपासून ते पक्षांच्या कार्यक्रमात प्रतिकॉँग्रेसचा झेंडा फडकत राहिला. मुख्यमंत्री असो की राष्ट्रीय नेते किंवा प्रभारी यांच्या दौर्‍यावरही उघडपणे ह्या मंडळीने बहिष्कार टाकला. दुसरीकडे छाजेड यांनी ‘येईल तो आपला’ अशी रणनीती आखत स्वत:चा गड मजबूत केला. स्वीकृत नगरसेवक पदही त्यांनी खिशात घातले. त्यानंतर विरोधकांची धार तीव्र होऊन डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह आमदार निर्मला गावित, माजी खासदार प्रताप वाघ, प्रदेश सरचिटणीस शरद आहेर, दिनकर पाटील यांनी छाजेड विरोधी गटाचे नेतृत्व केले. जाहीर कार्यक्रम, सभांवर बहिष्कार करूनही पक्षश्रेष्ठी दखल घेत नसल्याने अस्वस्थ विरोधकांनी थेट टिळकभवनासमोरच उपोषण करण्याचे हत्यार उपसले. पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेत स्थानिक स्तरावरच एकमताने नाव निश्चित करण्याची चाल खेळत वेळ मारून नेली. त्यात कधी कुटेंचे नाव पुढे आले, तर कधी शरद आहेर यांचे. परंतु, प्रत्येक नावाला कोणाचा ना कोणाचा विरोध झाल्याने विरोधकांमध्ये फूट पडली. त्याचा फायदा उचलत छाजेड यांनी आपली खुर्ची अबाधित ठेवली. निवडणूक तोंडावर आल्याचे बघून अखेर पक्षश्रेष्ठींनीही विरोधकांच्या समाधानाच्या दृष्टीने छाजेड यांची उचलबांगडी केली. मात्र, हा निर्णय होईपर्यंत छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. छाजेड यांच्या विरोधात ज्यांनी मोहीम उघडली, त्या गटातील एकाचीही वर्णी या जागेवर लागू शकली नाही.

नवीन अध्यक्ष आपल्याच गटाच्या असल्याचा दावा
नवनिर्वाचित शहराध्यक्ष बोरस्ते या आपल्याच गटातील असल्याचा दावा मावळत्या शहराध्यक्षांनी केल्यामुळे विरोधकांच्या जल्लोषावर विरजण पडले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी तूर्तास दोन्ही गटांना धक्का देत दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ, असा संदेश या निमित्ताने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात बोरस्ते यांच्यासमोर तटस्थपणे दोन्ही गटांना सामावून काम करण्याचे आव्हान असेल.