आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर विकास अाराखड्याला १५ मेपर्यंत अंतिम स्वरूप,आज हाेणार छाननी समितीची महत्त्वपूर्ण बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बहुचर्चित प्रारूप विकास अाराखडा अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर असून, अाराखड्याच्या तांत्रिक बाबींच्या छाननीसाठी बुधवारी (दि. २७) मंत्रालयात आयोजित बैठकीला सहसंचालकांसह विभागीय अायुक्त पालिका अायुक्तही उपस्थित राहतील. या बैठकीनंतर अाराखड्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या काेर्टात जाणार असून, तेच अंतिम मंजुरी देणार अाहेत. येत्या १५ मेपर्यंत अाराखड्याला अंतिम मंजुरी दिली जाईल, असे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनीही स्पष्ट केले अाहे.
विकास अाराखडा सुधारणा दुरुस्तीअंती गेल्या २३ मे राेजी प्रसिद्ध केला हाेता. त्यात सुमारे ७०५ अारक्षणांना कात्री लावली हाेती. याबराेबरच अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या गावठाण पुनर्विकासाचा मार्गही माेकळा झाला असून, त्यासाठी चार चटई क्षेत्र (एफएसअाय) देण्यापर्यंतचा पर्याय सुचविण्यात अाला. याबराेबरच झाेपडपट्टी पुनर्विकास याेजनेसाठी तीन एफएसअाय, तसेच अार्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यास्तव दुप्पट एफएसअाय देण्यासारखे उपायही प्रस्तावित करण्यात अाले.

या अाराखड्यामुळे शहरात ७० मीटर उंचीच्या म्हणजेच २३ मजली इमारतींचा मार्गही माेकळा झाला अाहे. अाराखडा तत्कालीन सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकती सूचना मागवल्या हाेत्या. आलेल्या २१४९ सूचना हरकतींवर नियोजन समितीने त्यावेळी निर्णय दिला हाेता. यानुसार पूर्वी जाहीर केलेल्या आराखड्यात ११७ बदल करत पालिकेचा विकास आराखडा मंगळवारी शासनास सादर केला. शासनाकडे पाठवलेल्या विकास आराखड्यात झालेल्या ११७ बदलांत आरक्षणाबाबत, रस्त्यांसंदर्भात इतर सर्वसाधारण बदलांचा समावेश आहे. तसेच विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीमधील १२७ ची तरतूद, अस्तित्वातील वापराबाबत मोजणी नकाशाच्या अनुषंगाने पडताळणीची तरतूद, आरक्षण बदलाची तरतूद तसेच अहवालात क्षेत्राबाबत नमूद असलेली टीप यामुळे अनेक आक्षेपांबाबत निर्णय घेण्याची आता आवश्यकता नाही.

शासनाकडे सादर अाराखड्यावर २७ राेजी हाेणाऱ्या छाननी समितीच्या बैठकीत चर्चा हाेईल. त्यात सहसंचालक सु. श्री. सुकळणकर, विभागीय अायुक्त एकनाथ डवले, पालिका अायुक्त डाॅ. गेडाम अादी उपस्थित राहणार अाहेत. पालिकेच्या अंगाने ते बाजू मांडतील. त्यानंतर हा अाराखडा मुख्यमंत्र्यांसमोर जाईल. अामदार जयंत जाधव यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना रणजित पाटील यांनी नाशिक अाणि पुणे पालिकेचा विकास अाराखडा येत्या १५ मेपर्यंत मंजूर हाेईल, असे सांगितले. त्या दृष्टीने राज्य शासनाचे प्रयत्नदेखील सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अाहे.

पूररेषेचासमावेश अाराखड्यातही शक्य : गोदावरीनदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी भविष्यात नदीच्या लाल रेषा क्षेत्रात इमारती जॉगिंग पार्कसारख्या बांधकामांना प्रतिबंध करावा यांसह लाल अाणि निळ्या पूररेषेची अाखणी करण्याचीही सूचना निरीने न्यायालयाकडे दिली अाहे. या संदर्भातील तरतुदींचा समावेश नव्या विकास अाराखड्यात शक्य असल्याचे सांगत निरीच्या सूचनांचा अायुक्तांच्या समितीने विचार करावा, असेही न्यायालयाने म्हटले अाहे. शिफारशींचा समावेश केल्यास नदीपात्रालगतची बांधकामे अडचणीत येतील. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडे पहावे लागेल.

{ विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीत नवीन तरतुदी.
{ टीडीआर दुपटीऐवजी अडीचपट.
{ समावेशक आरक्षणामधून जमीनधारक काही जागा, बांधकाम पालिकेस देऊन आरक्षण विकसित करू शकतो.
{ एक वा अनेक पद्धती अवलंबून आरक्षणातील जागा घेता येईल.
{ शेती विभागात शैक्षणिक वापरासाठी ०.४० एवढ्या चटई क्षेत्र निर्देशांक मर्यादेपर्यंत विनाअधिमूल्य बांधकाम अनुज्ञेय राहील.
{ इमारत उंचीबाबत नवीन धोरण जागेवरील अस्तित्वातील स्थिती जसे की, सर्व्हेे क्रमांक हद्द, रस्ता, नाला अन्य भौगोलिक बाबींची आखणी याबाबत भूमी अभिलेख विभागाकडील नकाशा ग्राह्य धरला जाईल.
{ शहरातील रस्त्यांचे जाळे वाढविण्यासाठी विशेष तरतूद.
{ रस्ते प्रस्तावित करताना बांधकामांना बाधा नाही.
{ ३० मी. रस्ते रुंदीकरण करताना त्यावरील भूखंडांना सामासिक अंतरात सवलत देण्यात येईल.
{ अारक्षणासाठी गावठाणात एकास अडीच तर गावठाणाबाहेर एकास दाेन टीडीअार दिला जाणार अाहे.
{ रस्त्याखालील क्षेत्रात एकास गावठाणात २.३ तर बाहेर १.८५ इतका टीडीअार िदला जाईल.