आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिन्यात यंत्रणा सुरू हाेईल, सिटीस्कॅनसाठी अद्यापही रुग्णांची फरपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिव्हिलमध्ये सिटीस्कॅन करायचे म्हटले की, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जावे लागणार अाणि सिटीस्कॅन झाल्यानंतर परत जिल्हा शासकीय रुग्णालयात रिपाेर्टसाठी किमान दोन तास तरी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार अशा परिस्थितीमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून रुग्णांना अार्थिक झळ तर साेसावी लागत अाहेच, शिवाय त्यांचा वेळही वाया जात अाहे. जिल्हाभरातून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना सिव्हिल प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका बसत असून, शासनाने तब्बल दोन कोटी खर्च करून घेतलेली अत्याधुनिक मल्टी सिटीस्कॅन यंत्रणा अाजही धूळखात पडून अाहे. विशेष म्हणजे, जुलै २००९ पासून सिटीस्कॅन यंत्रणा बंद असतानाही प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याची गरज वाटत नसून, गरीब रुग्णांची मात्र फरपट सुरूच अाहे. त्यावर ‘डी.बी. स्टार’चा प्रकाशझोत...
जिल्हाभरातून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना संदर्भ सेवाचाच अाधार; सिव्हिलमधील सुस्त यंत्रणेचा बसताेय फटका
डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हाशल्यचिकित्सक, सिव्हिल
{ नवीन सिटीस्कॅन यंत्रणा निधी मिळूनही धूळखात पडून का?
-शासनाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी अत्याधुनिक मल्टी सिटीस्कॅन यंत्रणा खरेदी करण्यात आलेली अाहे. या यंत्रणेच्या इन्स्टॉलमेंट खर्चाचे बिलदेखील मंजूर झालेले आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित हाेणार अाहे.

{ही अत्याधुनिक यंत्रणा नेमकी कधी सुरू होणार?
-जिल्हा रुग्णालयाची सिटीस्कॅन यंत्रणा सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनस्तरावर सुरू असून, लाइट, वायरिंग इतर महत्त्वाची कामे पूर्ण होताच सिटीस्कॅन सुरू होईल. यासाठी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागेल.

{जिल्हा रुग्णालयातून संदर्भमध्ये सिटीस्कॅनसाठी पाठविल्या जाणाऱ्या रुग्णाचे प्रचंड हाल होतात, त्याचे काय?
-जिल्ह्यातील रुग्णांना सिटीस्कॅनसाठी संदर्भमध्ये व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. त्यांची कुठलीही गैरसाेय हाेऊ नये, यासाठी विशेष लक्ष घातले जाईल.
सर्वसामान्य रुग्णांसाठी अल्पदरात जीवनदायी ठरू शकणारी जिल्हा शासकीय रुग्णालयामधील सिटीस्कॅन यंत्रणा जुलै २००९ पासून बंद पडली आहे. काही वर्षांपूर्वी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून ही सिटीस्कॅन यंत्रणा बसवण्यात अाली हाेती. कालांतराने तिची वयोमर्यादा संपली अन‌् ती निकामी झाली. यानंतर रुग्णांची हाेणारी गैरसाेय पाहता जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून नवीन सिटीस्कॅन यंत्रणा खरेदी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात अाला. तेव्हा सुमारे दोन कोटी रुपयांची अत्याधुनिक मल्टी सिटीस्कॅन यंत्रणा शासनाने खरेदी करून दिली. मात्र, ही यंत्रणा तब्बल दाेन महिन्यांपासून इन्स्टाॅलेशन झाल्याने सिंहस्थ रुग्णालयाच्या एका खोलीत धूळखात पडून अाहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून घेण्यात अालेली ही यंत्रणा गरीब सर्वसामान्य रुग्णांच्या वापरात यावी, यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून तातडीने पावले उचलणे गरजेचे असताना प्रत्यक्षात दाेन महिने उलटूनही तसे हाेताना दिसून अालेले नाही. संदर्भसेवा रुग्णालयात जिल्हा शासकीय रुग्णालयातून येणाऱ्या सुमारे २५ रुग्णांचे दररोज सिटीस्कॅन केले जाते. मात्र, या ठिकाणी सिटीस्कॅन झाल्यानंतर त्यासंदर्भातील रिपोर्टसाठी रुग्णांना पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या अाहेत. याकडे रुग्णालय प्रशासन मात्र साेयीस्करपणे दुर्लक्षच करीत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.

रेडिआेलॉसिस्टची कामे परिचारिकांकडे..?
संदर्भसेवामधून सिटीस्कॅन काढून आल्यानंतर सिव्हिलच्या सोनोग्राफी कक्षासमाेर रुग्णांना रांगेत बसावे लागते. या रुग्णांकडून सिटीस्कॅन जमा करण्याची जबाबदारी ज्या परिचारिकांकडे आहे, त्याच परिचारिका सोनोग्राफीचीदेखील कामे सांभाळत असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले. मुख्य म्हणजे, रेडिआेलॉसिस्टची कामे परिचारिकांकडूनच करून घेतली जात असल्याचेही सांगण्यात अाल्याने प्रशासनाच्या भाेंगळ कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत अाहे.

यंत्रणा बंद तरी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
जिल्हा शासकीय रुग्णालयामधील सिटीस्कॅन यंत्रणा हाताळण्यासाठी प्रशासनाकडून सिटीस्कॅन विभागाला टेक्निशियन, रेडिआेलॉजिस्ट, परिचारिका अन्य अशा एकूण अाठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली अाहे. रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणा जुलै २००९ पासून बंद पडली अाहे, मात्र तरीही या कर्मचाऱ्यांना याच विभागात नियुक्ती करण्यात अाल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे.

खासगी सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर सिटीस्कॅन करण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यानंतर संदर्भ सेवा रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. मात्र, तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने गैरसाेयच हाेते. अशा वेळी तातडीने सिटीस्कॅन करावयाचे असल्यास खासगी सेंटरमध्ये जाण्याचा सल्लाही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जाताे.

इन्स्टाॅलेशन हाेणार कधी?
सातवर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणा बंद आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विभागीय संदर्भ रुग्णालयात जावे लागते. गरीब-गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणारी ही महत्त्वपूर्ण यंत्रणा बंद असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसाेय हाेत अाहे. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाकडून दोन कोटी खर्चून अत्याधुनिक मल्टी सिटीस्कॅन यंत्रणा घेण्यात अाली. मात्र, ही महागडी यंत्रणा केवळ इन्स्टाॅलेशनअभावी सिंहस्थ रुग्णालयात धूळखात पडून असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. मुख्य म्हणजे, इन्स्टाॅलेशनसाठी शासनाकडून निधीही प्राप्त झाला असताना अद्याप ती पडून असल्याने प्रशासनाची उदासीनता अधाेरेखित हाेत आहे.

सिव्हिलमध्येच सुविधा मिळावी
^सकाळपासून संदर्भ रुग्णालयात रांगेत उभे राहून सिटीस्कॅन काढल्यानंतर सिव्हिलमध्ये रिपोर्ट घेण्यासाठी आलो. मात्र, रेडिआेलॉजिस्ट साडेचार वाजेनंतर येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात ते वेळेवर येतच नाहीत. त्यामुळे सिव्हिलमध्येच सिटीस्कॅन यंत्रणा सुरू करण्यात यावी. -विलास वाघ, रुग्णाचे नातेवाईक

वारंवार फेऱ्या मारताेय...
^डॉक्टरांनीआईचासिटीस्कॅन काढण्यास सांगितल्याने मी सिव्हिलमध्ये आलो. तेव्हा सिटीस्कॅनसाठी संदर्भ रुग्णालयात पाठवले. स्कॅन काढल्यानंतर रिपोर्टसाठी पुन्हा सिव्हिलमध्ये पाठविण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नव्हते, पुन्हा संदर्भमध्ये गेल्यानंतर त्यांनी पुन्हा सिव्हिलमध्येच जाण्याचा सल्ला दिला. -सईद मनियार, रुग्णाचे नातेवाईक
रुग्णांना मनस्ताप...

रिपोर्टसाठी तीन तास प्रतीक्षा
^सकाळीदहावाजेपासून सिव्हिलमध्ये सिटीस्कॅन काढण्यासाठी अालो होतो. तेव्हा संदर्भ सेवा रुग्णालयात जाण्यास सांगितले. सिटीस्कॅन काढून आल्यानंतर आता तीन तासांपासून रुग्णालयात बसलोय. मात्र, रिपोर्ट देणाऱ्या मॅडम पावणेपाच वाजूनही आलेल्या नाहीत. अाम्हा गरीब रुग्णांनी काेणाकडे दाद मागायची? -रविकांत बोराडे, रुग्ण

काय आढळले ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत
जिल्हाशासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅनबाबत ‘डी. बी. स्टार’कडे माेठ्या संख्येने तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ‘डी. बी. स्टार’ने मंगळवारी पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी, सिन्नर, निफाड अन्य भागातून सकाळी नऊ वाजेपासून आलेल्या रुग्णांना शालिमार भागातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात सिटीस्कॅनसाठी पाठविण्यात येत हाेते. विशेष म्हणजे, चाैकशी मदत कक्षाच्या टेबलवर कुणीही कर्मचारी नसल्याने अनेक रुग्णांना तर याेग्य माहितीही दिली जात नव्हती. विशेष म्हणजे, संदर्भ रुग्णालयात रांगेत उभे राहून सिटीस्कॅन काढून अाल्यानंतर सिव्हिलमध्ये त्याच्या रिपोर्टसाठी पुन्हा सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत थांबावे लागत असल्याचे एक कर्मचारी संबंधित रुग्णांना सांगत हाेता. त्यामुळे रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत हाेता. पैसे तर खर्च हाेतातच, मात्र वेळही वाया जात असल्याने अनेक जणांचा हिरमाेड झालेला दिसून अाला. सकाळी नऊ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात आलेल्या या रुग्णांना सिटीस्कॅन त्याच्या रिपोर्टसाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागल्याने अनेकांनी या यंत्रणेबाबत ‘डी. बी. स्टार’कडे तक्रारी केल्या.

रिपाेर्टसाठी तासन‌्तास प्रतीक्षाच
जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅनसाठी अालेल्या रुग्णांना विभागीय संदर्भ सेवामध्ये पाठविले जाते. अनेक रुग्ण ग्रामीण भागातील असतात, त्यामुळे त्यांना शहराची माहिती नसते. अशा रुग्णांसाठी रुग्णालय प्रशासनाने ‘हेल्प डेस्क’ बनवला अाहे. मात्र, या हेल्प डेस्कमध्ये कर्मचारीच बसत नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे, स्कॅन करून अालेल्या रुग्णांना सिव्हिलमधील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रिपाेर्टसाठी तासन‌्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही दिसून अाले.

{शासनाची ०२ कोटी रुपयांची अत्याधुनिक मल्टी सिटीस्कॅन यंत्रणा दाेन महिन्यांपासून पडून
{सिव्हिलमधून येणाऱ्या िकमान २५ रुग्णांचे राेज संदर्भ सेवा रुग्णालयात केले जाते सिटीस्कॅन
{तीन महिन्यांत सिव्हिलमधून पाठवलेले २५०० सिटीस्कॅन संदर्भमध्ये झाले
{संदर्भ सेवा रुग्णालयात एका रुग्णाकडून पोटाच्या सिटीस्कॅनसाठी ७५०, तर डोक्याच्या सिटीस्कॅनसाठी ५०० रुपये आकारले जातात.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅनसाठी येणाऱ्या रुग्णांना अशाप्रकारे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पेपर तयार करून दिले जातात संदर्भ सेवा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जाताे.
बातम्या आणखी आहेत...