आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार करा ‘सर्जन’शील; आरोग्य उपसंचालकांची तंबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या लेटलतिफपणावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार यांनी सिव्हिल सर्जन डॉ. रवींद्र शिंगे व अन्य दोन प्रमुख डॉक्टरांना तंबी देत कारभार सुधारण्याचे आदेश दिले. बेशिस्त डॉक्टरांवर कारवाईचे व ओपीडीतील डॉक्टरांना वॉर्डातील ड्युटीसाठी न पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

अलीकडच्या काळात जिल्हा रुग्णालयाचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी अपंगांच्या प्रमाणपत्र वितरणातील सावळ्या गोंधळाकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले होते. डॉक्टर वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बुधवारी ‘दिव्य मराठी’ने इनव्हेस्टिगेशन करून ओपीडीतील डॉक्टरांच्या येण्याच्या वेळा तपासल्या. सकाळी आठची वेळ असताना अनेक डॉक्टर साडेनऊनंतर येत असल्याचे त्यात निष्पन्न झाले. या डॉक्टरांनी ओपीडीऐवजी वॉर्डातील पेशंटची तपासणी करीत असल्याची सारवासारव केली होती. कहर म्हणजे, या डॉक्टरांना उशिरा येण्याची मुभा आपणच दिल्याचे सर्मथनवजा स्पष्टीकरण डॉ. शिंगे यांनी केले होते. या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने पवार यांनी ‘सिव्हिल’मधील कारभार सुधारण्याबाबत तातडीने सूचना केल्या. यामुळे लवकरच रुग्णांना चांगली सेवा मिळेल, असे डॉ. पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.