आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिव्हिल’च्या समस्यांकडे ‘पीडब्ल्यूडी’कडून दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सर्वच विभागांकडून दबाव असतो. मात्र, रुग्णालयाला इतर मूलभूत सुविधांसाठी शासनाच्या इतर विभागांवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयाची सर्व धुरा सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. मात्र, या विभागाकडून रुग्णालयाच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णालयाच्या सुशोभीकरणाला बाधा निर्माण होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयास महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो, तर इतर छोटे-मोठे बांधकाम हे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येते. या बांधकाम विभागाने कुंभमेळा रुग्णालय बांधले, मात्र या रुग्णालयाचा एका वर्षातच निकृष्ट कामाचा दर्जा उघड झाल्याने बांधकाम विभागाच्या कामावर संशय व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालयात कायाकल्प योजनेंतर्गत परीक्षणासाठी एक पथक आले होते. या पथकानेदेखील बांधकामाबाबत किरकोळ त्रुटी काढल्याने कायाकल्प योजनेमध्ये रुग्णालयाचे गुणदेखील कमी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अांतररुग्ण विभागातील फरशी फुटली आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. अशा अनेक किरकोळ समस्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या रुग्णालय परिसरातील पोलिस चौकी आणि अांतररुग्ण विभागाच्या छताला गळती लागली आहे. जलकुंभ अखेरच्या घटका मोजत आहे. रुग्णालयाच्या परिसरात उंदीर, घूस यांचे साम्राज्य वाढले आहे. अशा अनेक समस्यांनी रुग्णालय प्रशासन मेटाकुटीस आले आले. या सर्व समस्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत अाहे.

कर्मचारी नावालाच
बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय आहे. येथे एकही कर्मचारी वेळेवर राहत नसल्याने किरकोळ कामांसाठी दोन दिवस खोळंबा होतो. रुग्णालयाकडून आपल्याच कर्मचाऱ्यांकडून किरकोळ काम केले जात असल्याने ही बाब बांधकाम विभागाच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे कर्मचारी रुग्णालय परिसरात थांबत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...