आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीतील स्वच्छकांची पदे गोठविलेलीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक शहरासह राज्यातील विविध आगारांमध्ये एसटी बसेस व आवार स्वच्छतेसाठी महामंडळाने नियुक्त केलेली खासगी ठेकेदारी रद्द करून अनुकंपा तत्वावरील कर्मचार्‍यांकडून स्वच्छता केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छकांच्या 80 जागा आजही गोठविलेल्या असल्याने मयत कर्मचार्‍यांचे कुटुंबिय आठ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत, यावरून एसटी महामंडळाने मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप मान्यताप्राप्त संघटनेने केला.

विभागातील पंचवटी आगार, मध्यवर्ती बससस्थानक व नाशिक 2 आगारातील सुमारे 300 बसेसच्या स्वच्छतेसाठी चार वर्षांपूर्वी महामंडळाने खासगी ठेकेदारास कंत्राट दिले होते. परंतु, या ठेकेदारांच्या कामगारांकडून बसचालक, अधिकार्‍यांनाच उलट बोलून हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी दीड वर्षांपूर्वी भद्रकाली पोलिस ठाण्यात चालकास मारहाण आणि पंचवटी पोलिस ठाण्यात आगार व्यवस्थापकास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठेकेदारीपूर्वी बसेसच्या स्वच्छतेचे काम महामंडळाच्या स्वच्छक कर्मचार्‍यांकडूनच केले जात होते. दरम्यान, विधीमंडळात कामगारांच्या मागण्यासाठी आमदार जयंत जाधव यांनी महामंडळाकडून स्वच्छकांची 80 पदे गोठविल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लेखी स्वरूपात सदरची पदे गोठविलेली नसून ठेकेदाराऐवजी स्वच्छकांकडूनच कामे केली जात असल्याची माहिती दिली आहे. प्रत्यक्षात मात्र नाशिक आगारात 25 पदे व इतर जिल्ह्यातील 65 पदे आजही गोठविलेलीच असून, तेथे ठेकेदाराच्या कामगारांकडून तर, काही ठिकाणी अन्य आगारातील स्वच्छकांकडून बसेस धुण्याची कामे केली जात असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे.