आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता माेहीम राष्ट्रवादीची की भुजबळ साम्राज्याची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : भ्रष्टाचार, लाचखाेरी, बनावट नाेटा छपाई अशा एक नाही अनेक गंभीर मुद्यांवरून राष्ट्रवादीचे बडे नेते तुरुंंगात गेल्याचे बघून बांधबंदिस्तीसाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादीत स्वच्छता माेहीम सुरू झाल्याची दवंडी पिटत सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना प्राेत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र, पवार यांच्या प्रत्येक शब्दामागे अनेक गर्भित अर्थ वा इशारे असतात असे ज्याप्रमाणे म्हटले जाते, त्याचप्रमाणे स्वच्छता माेहिमेचा एक धागा छगन भुजबळ साम्राज्याची सफाई करण्याकडेही जात असल्यासारखे अर्थ वा तर्क निघू लागले.
 
भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर ज्या पद्धतीने नाशिकमधील राष्ट्रवादीचे राजकारण दिवसागणिक पलटत अाहे ते बघता राष्ट्रवादीत खराेखरच काेणाची सफाई हाेणार, हा प्रश्न अाता कार्यकर्त्यांसाठी गहन झाला अाहे. 
 
गेल्या तीस वर्षांचा इतिहास बघता नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक भरभरून काेणाला राजकारणाबाबतीत हात दिला असेल तर ताे म्हणजे शरद पवार यांनाच. मग पवार यांचा पक्ष काेणताही असाे, नाशिककर खंबीरपणे त्यांच्यामागे अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत उभे राहिले. पुण्यातील पवारांवर नाशिककरांचे प्रेम असण्यामागचे कारण म्हणजे दाेघांचाही रस ज्या शेतीत हाेता त्याअनुषंगाने हे बंध फुलत गेले हाेते.
 
 शेतकरी संघटनेची चळवळ भरात असताना पवार यांनी अापला प्रभाव कायम ठेवला. पुलाेदच्या प्रयाेगात पवारांमागे सर्वच्या सर्व अामदारही नाशिककरांनी पाठवून संपूर्ण ताकदीनिशी उभे असल्याचे दाखवून दिले हाेते. पवार यांच्या प्रभावक्षेत्रातील जिल्ह्यापैकी नाशिक एक असताना सन २०००च्या सुमारास शिवसेनेतून फुटून राष्ट्रवादीत अालेल्या भुजबळ यांनी नाशिकच्या भूमीत पाय राेवण्याचा प्रयत्न केला.
 
 अापले अाजाेळ असल्याचे कारण देत भुजबळ यांनी पथुरली मांडली असली तरी त्यांना स्थानापन्न हाेण्यात खरी मदत पवारांमुळेच झाली. मात्र, भुजबळ हे यशाची एकेक पायरी चढू लागल्यावर पुढे त्यांचकडून पवारांची माणसे एकेक करून बाजूला हाेत गेली. स्वत:ची माणसे तयार करणे, त्यांना पदे देण्याचा सपाटा सुरू झाल्यामुळे पवार यांच्यामागे असणारा एक माेठा गट कधी बाजूला सारला गेला हे कळलेच नाही. 
 
परिणामी, पवार हे पक्षाचे अध्यक्ष असले तरी त्यांच्याकडे जाऊन पदे मिळत नाही, असा एक समज दृढ झाला. त्यानंतर पवार यांनी हस्तक्षेपाचा प्रयत्न करून बघितला, मात्र भुजबळ यांचे साम्राज्य इतके वाढले हाेते की सहजासहजी पंगा घेणे मुश्कील झाले हाेते. खासकरून राष्ट्रवादीत राहून अाेबीसींसाठी समता परिषदेची वेगळी चूल मांडणे देशभरात या परिषदेचा डंका पिटून स्वत:ची वेगळी अाेळख निर्माण करण्याची बाब राष्ट्रवादीतील ‘दादा’ नेत्यांना सलू लागली हाेती. 
 
मात्र, पवार यांच्याकडून जाेपर्यंत यात उघडपणे हस्तक्षेप हाेत नाही ताेपर्यंत थेट विराेधाची भूमिका घेण्यासाठी काेणी धजावले नाही. सत्तापालट झाल्यानंतर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जेव्हा भुजबळ पुतणे समीर यांना तुरुंगात जावे लागल्यानंतर सर्व हिशेब चुकते करण्यासाठी बेरीज-वजावट सुरू झाली अन‌् नाशिकमधील सर्व निर्णयही बदलले जाऊ लागले. 
 
सुरुवातीला शहराध्यक्षपदावरून अामदार जयवंत जाधव यांना हटवताना भुजबळ यांच्याशी तुरुंगात जाऊनही सल्लामसलत केल्याचे दाखवले गेले. मात्र, ज्या ठिकाणी खराेखरच राष्ट्रवादीचा प्रभाव हाेता अशा जिल्हा परिषद अर्थातच ग्रामीण क्षेत्रातील निर्णयाबाबत भुजबळ यांना डावलले जात असल्याची भावना समर्थक बाेलू लागले.
 
भुजबळ यांच्या समर्थनासाठी निघालेल्या माेर्चाला अाेबीसी विरुद्ध मराठा असा रंग दिला गेला. भुजबळांचे साम्राज्य अाणि राष्ट्रवादीचा गडही ढसाळू लागला. कारण दाेन्ही गडांची पक्ष ही सामाईक भिंत असल्यामुळे दाेघांचे पाय खाेलात रुतू लागले. 

माजी खासदार देवीदास पिंगळे हे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे पैसे हडप केल्याच्या प्रकरणावरून गजाअाड गेले सर्वात धक्कादायक म्हणजे पक्षाचा अाक्रमक असा कार्याध्यक्ष छबू नागरे बनावट नाेटा छपाई प्रकरणात देशद्राेहासारखा गंभीर गुन्ह्यात सापडला. या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या भाळी बसलेला भ्रष्टाचाराचा शिक्का अधिकच ठळक झाल्याचे बघून स्थानिक पदाधिकारी धास्तावले.
 
 ताेंडावर निवडणुका असल्यामुळे करायचे काय, असा पेच निर्माण झाला. अशात पवार यांना नाशिकमध्ये मलमपट्टीसाठी अावतण धाडले तडक नाशिकचा रस्ता पकडत पवार यांनी सैरभैर राष्ट्रवादीजनांना स्वच्छता अभियानाचा नारा देत अाश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दाैऱ्यात पवार यांची शांतता, संयम ढळल्याचे दिसून अाले. 
 
पिंपळगाव बसवंत येथे छगन भुजबळ यांचे छायाचित्र हाेर्डिंगवरून गायब झाल्यावर अाेबीसींवर अन्यायाचा गजर साेशल मीडियावर वाजवला गेला. वास्तविक पवार यांनी ही बाब दुर्लक्षित केली पाहिजे हाेती. भुजबळ यांच्याबराेबर पक्ष कसा भक्कमपणे उभा अाहे, असे त्यांनी सांगितले पाहिजे हाेते. मात्र, त्यांनी शहर जिल्हा अशा दाेन्ही मेळाव्यात भुजबळांना दुर्लक्षितच ठेवले.
 
 सर्वात गंभीर म्हणजे पवार यांनी शहर मेळाव्यात छबू नागरे हे रत्न पक्षात काेणी अाणले, त्याचा गाॅडफादर शाेधण्याचे जाहीरपणे अादेश देऊन अाश्चर्याचा धक्का दिला. नागरे हे पक्षात जितेंद्र अाव्हाड यांचे बाेट धरून अाले, मात्र त्यांची खरी अाेळख भुजबळांच्या खांद्याला खांदा भिडवून अाक्रमकपणे काम केल्यामुळे झाल्यामुळे त्यांचा गाॅडफादर काेण, असा प्रश्न उपस्थितांना पडला. 
 
याेगायाेगाने अाव्हाड हे पवार यांच्याच शेजारी व्यासपीठावर असल्यामुळे हा राेख भुजबळ यांच्याच दिशेने असल्याचा अर्थ प्रस्तुत झाला. पत्रकार परिषदेत पवार यांनी राष्ट्रवादीत स्वच्छता माेहीम करण्यासाठीच अाल्याचे स्पष्ट केल्यामुळे नागरे वा पिंगळे यांच्यासारखा फारसा प्रभाव नसलेल्यापुरता याची व्याप्ती नसेल याची जाणीव समर्थकांना प्रकर्षाने झाली. गेल्या काही महिन्यांत भुजबळ यांचा अादेश मानण्यासाठी काेणी तयार नसल्याचे सांगितले जाते.
 
 ज्या भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा डेरा असायचा तेथे सहा महिन्यांत चिटपाखरूही येत नाही. राष्ट्रवादी भवनात अाता निवडणुकीचा अपवादवगळता कार्यकर्त्यांची संख्या अत्यल्प अाहे. अशा परिस्थितीत पवार यांच्या दाैऱ्यानंतर एक घाव दाेन तुकडे, असेच चित्र निर्माण झाले अाहे. भुजबळ समर्थकांना अागामी निवडणुकीत तिकिटे मिळतात की नाही, अशी भीती वाटत अाहे. म्हणून त्यांची स्वतंत्र चूल मांडायची का इथपर्यंत चर्चा अाहे.
 
 भुजबळांना डावलून पक्षाची सत्ता नवीन नेत्याच्या हातात देण्याचा विचार असेल तर ही बाब पक्षासाठी येत्या काळात निश्चितच धाेक्याची घंटा ठरू शकते. याचे कारण म्हणजे भुजबळ यांचे साम्राज्याची सफाई करणे इतके साेपे नसून, गेल्या पंधरा वर्षांत अत्यंत तळापर्यंत त्यांनी पेरून ठेवले अाहे. त्यात महापालिका जिल्हा परिषदेची निवडणूक ताेंडावर असून, सत्ता नसताना एकेक कार्यकर्ता पक्षात टिकवून ठेवण्याचे माेठे अाव्हान अाहे. अशा परिस्थितीत विषाची परीक्षा घेण्यापेक्षा सबुरीने घेतले तरच पक्षासाठी अनुकूल ठरेल. 
 
स्वच्छता माेहीम फक्त नाशिकपुरतीच का? 
राष्ट्रवादीवर केवळ नाशिकपुरतेच भ्रष्टाचाराचे अाराेप अाहे त्यामुळे येथे स्वच्छता माेहीम करून पक्षाची प्रतिमा उंचावेल, असेही गृहीत धरून कसे चालेल. मुळात भ्रष्टाचाराचे अाराेप हे चालूच असतात. त्यामुळे एकेकाळी खुद्द पवार यांनाही गंभीर भ्रष्टाचाराच्या अाराेपांचा सामना करावा लागला. त्यांचे पुतणे तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सिंचन घाेटाळ्यासमाेर गंभीर अाराेप असून, त्यांचीही चाैकशी सुरू अाहे.
 
त्यामुळे पवार यांची स्वच्छता माेहिमेची व्याप्ती महाराष्ट्रापुरती असेल त्यात बड्या नेत्यांनाही त्याचा भाग बनवले जाणार असेल तरच या घाेषणेबाबत गांभीर्याने घेतले जाईल, अन्यथा नेहमीप्रमाणे पवार बाेलतात एक करतात वेगळे याप्रमाणे विचार करून लाेक विसरून जातील हे मात्र नक्कीच. 
बातम्या आणखी आहेत...