आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष अभियानही फार्स; अस्वच्छतेचाच कळस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ हे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: हातात झाडू घेत देशपातळीवर स्वच्छता मोेहिमेला सुरुवात केली होती. या स्वच्छता मोहिमेत शासकीय कार्यालयांचाही सहभाग महत्त्वपूर्ण होता. सुरुवातीच्या काळात माेठा गाजावाजा करीत स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा झाला, त्यानंतर मात्र अल्पावधीतच माेहिमेकडे पाठ फिरवली गेली. अनेक ठिकाणी तर केवळ छायाचित्र काढण्यापुरतीच ही माेहीम मर्यादित राहिल्याने या अभियानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेऊ लागले.
या अभियानाला दोन वर्षे पूर्ण होत अाले असताना अाता राज्य सरकारने महात्मा गांधी जयंती अर्थात अाॅक्टाेबरपासून शहरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छता सप्ताह म्हणून राबविण्याचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात ते अाॅक्टाेबरदरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. विशेष म्हणजे, या मोहिमेत रात्रीच्या वेळीही शहरात ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. या अभियानाविषयी अधिकाधिक जनजागृती होण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणूनही नेमणूक झाली होती. मात्र, या सप्ताहांतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम अाजघडीला कागदावरच राहिल्याचे दिसून येत अाहे. शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांसह गोदावरीही अस्वच्छतेच्या फेऱ्यात अडकली आहे. या माेहिमेकडून अपेक्षा असताना अाता तीदेखील फार्सच ठरल्याने शहर स्वच्छतेचा प्रश्न कायम असल्याचे बाेलले जात अाहे.

हे उपक्रम ठरले फक्त कागदावरच....
प्रभातफेरीकाढणे, नाट्यगृह, पालिका रुग्णालयात स्वच्छता, शहरातील शाळांमध्ये जनजागृती स्वच्छता मोहीम, शहर परिसरातील डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नष्ट करून घराेघरी जाऊन प्रबोधन करणे, हागणदारीमुक्त नाशिकसाठी ठिकठिकाणी जनजागृती, गोदावरी नदीची स्वच्छता, सप्ताहांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारी शाळा, महाविद्यालये, रहिवासी संघ तथा स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात हे उपक्रम कागदावरच राहिले आहेत.

ना जनजागृती, ना प्रभातफेरी
महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेंतर्गत शहरातील सर्व विभागांत प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांत आरोग्य, स्वच्छतेविषयी जनजागृतीचे तथा प्रबोधनात्मक कार्यक्रम हाेणार हाेते. त्याचबराेबर शाळेतील वर्ग, कार्यालय परिसरात स्वच्छता करून प्रभातफेरीद्वारे प्रबाेधन केले जाणार हाेते. मात्र, महापालिका प्रशासनाच्या अारोग्य विभागाकडून सप्ताहांतर्गत ना जनजागृती करण्यात अाली, ना प्रभातफेरीद्वारे विद्यार्थी, नागरिकांचे प्रबाेधन करण्यात अाले.

रात्रपाळीचाही विसरच
‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत रात्रपाळीतही शहर स्वच्छता करण्यात येणार असल्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले हाेते. मात्र, शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता पाहता निदान स्वच्छता सप्ताहात तरी पालिका प्रशासनाने प्रभावी कार्य केले असते तर हे चित्र दिसले नसते, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

अावाहन करणाऱ्या फलकांचीच दैना...
कचरा टाकण्याच्या, तसेच निर्माल्य संकलन कलशातच निर्माल्य टाकण्याबाबत सूचना करणारे फलक पालिकेने उभारले अाहेत खरे. मात्र, याच ठिकाणी कचरा, निर्माल्य टाकून अस्वच्छता केली जात असल्याचे दिसून अाले अाहे.

गोदा परिसर कधी होणार प्रदूषणमुक्त?
गोदावरी नदी महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. विशेष स्वच्छता सप्ताहांतर्गत महापालिका प्रशासनाकडून गोदावरी स्वच्छतेसाठी एक दिवस देण्यात येणार होता. मात्र, प्रशासनाने नेहमीप्रमाणे या वेळीही उदासीनताच दाखवली असल्याने नदीपात्र, तथा गाेदाकिनारी अस्वच्छता कायम असल्याचे चित्र ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले. रामकुंड, गाेदाकाठ परिसरात माेठ्या प्रमाणावर कचऱ्याचे, घाणीचे साम्राज्य पसरले असताना प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्षच करीत अाहे.
नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, त्यांच्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियानाची साद घातली. ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीचे औचित्य साधत महापालिका प्रशासनाकडूनही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात अाली. मात्र, नेहमीप्रमाणे यंदादेखील ही मोहीम फार्सच ठरली असून, या अभियानांतर्गत आखण्यात आलेले विविध उपक्रम कागदावरच राहिल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे. शहर स्वच्छतेविषयी उदासीन प्रशासनाच्या िनष्क्रिय कारभारावर टाकलेला हा प्रकाशझोत...
महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिका प्रशासनाकडून अाखण्यात अालेल्या उपक्रमांना पालिका अधिकाऱ्यांनीच दाखवली ‘केराची टाेपली’... शहरात ठिकठिकाणी
अस्वच्छता कायम
{ स्वच्छता मोहीम राबवूनही अद्याप शहरात अस्वच्छता ‘जैसे थे’च अाहे. नेमके काय कारण?
-काही अडचणींमुळे माेहीम प्रभावीपणे राबवता अाली नाही. शहरात अाता लवकरच प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसे नियाेजन सुरू अाहे.
{स्वच्छता सप्ताहांतर्गत जाहीर केलेले अनेक उपक्रम केवळ कागदावरच राहिल्याने प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा स्पष्ट झाली अाहे, त्याचे काय?
-अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हा उपक्रम राबविण्याबाबत अडचणी येत आहेत. लवकरच याेग्य त्या उपाययाेजना निर्णय हाेऊन शहरभरात हा विशेष स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. जेणेकरून शहरात स्वच्छतेचा प्रश्न उद‌्भवणार नाही.
बातम्या आणखी आहेत...