आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबाेधनावर भर, प्रत्यक्ष कृतीचा मात्र विसर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेश विसर्जनासाठी नदीकाठ परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता महापालिका प्रशासनाकडून नदी, परिसर स्वच्छ राहण्याबाबत स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज होती. मात्र, प्रशासनाकडून याकडे पुरेसे लक्ष दिल्याने नदी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. गणेश विसर्जनासाठी या ठिकाणी प्रशासनाकडून निर्माल्य कलशांचीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परिणामी, गणेश विसर्जनानंतर गोदावरीकाठ ते तपोवन परिसरापर्यंत ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले अाहे. विशेष म्हणजे, नदीपात्राची स्वच्छता राखण्यासाठी जबाबदारी नेमलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या प्रकाराकडे कानाडोळा केला जात असल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे. परिणामी, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना, नागरिकांना अस्वच्छता, दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून नदीपात्राची स्वच्छता ठेवावी, याबाबत नागरिकांना सूचना करण्यात येत असताना, दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून प्रदूषणाने वेढलेल्या नदीची स्वच्छता करण्याबाबत मात्र ठोस पावले उचलण्यात अालेली नाहीत. निर्माल्य कलश नसल्याने अनेकांकडून ठिकठिकाणी निर्माल्य टाकून देण्यात आले आहे. तसेच, जे निर्माल्य कलश प्रशासनाकडून गाेदाकाठ परिसरात ठेवण्यात आलेले होते ते गच्च भरले असूनही विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी पडून होते. काही निर्माल्य कलश थेट नदीपात्रात पडलेले असल्याने नदीची स्वच्छता ठेवण्याबाबत प्रशासन किती सजग होते, याची प्रचिती येत आहे.
नदीकाठालगत गणेशमूर्ती
गोदाघाट,तपोवन परिसर, लक्ष्मीनारायण घाट आदी परिसरात नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मात्र, गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी या परिसरात अनेक मूर्ती काठालगतच तशाच ठेवण्यात आलेल्या होत्या. त्याचबराेबर कलश नसल्याने सर्वत्र निर्माल्य पडलेले दिसून अाले.

थर्माकाॅल, निर्माल्य थेट नदीपात्रात टाकण्यात अाल्याने माेठ्या प्रमाणावर प्रदूषण हाेत अाहे.
रामकुंड, गाेदावरीकाठी असे निर्माल्य पडलेले अाहे. पालिकेने केवळ फलकांद्वारे प्रबाेधनापेक्षा निर्माल्य संकलनासाठी पुरेसे कलश ठेवले असते तर कदाचित असे अोंगळवाणे चित्र दिसले नसते.

रामसृष्टी उद्यानातही सर्वत्र निर्माल्य
सिंहस्थात भाविकांसाठी महापालिका प्रशासनाने तपोवन परिसरात रामसृष्टी उद्यान साकारले. मात्र, या उद्यानाच्या देलभाल-दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासनाने उदासीनताच दाखवली अाहे. विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, प्रशासनाकडून या ठिकाणी ना स्वच्छता ठेवण्याबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली, नाही निर्माल्य कलश ठेवण्यात अाले. परिणामी, सर्वत्र निर्माल्य पसरले असल्याचे चित्र दिसून अाले. विसर्जनानंतरही स्वच्छता कर्मचारी नेमण्यात अाले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीकडे केल्या.

पालिकेने लक्ष द्यायला हवे...
^गणेशभक्तांनी बाप्पांची मूर्ती विसर्जित करून तिची विटंबना करण्यापेक्षा मूर्ती दान करायला हवी. महापालिका प्रशासनानेही याेग्य प्रकारे नियाेजन करायला हवे. केवळ फलकांद्वारे जनजागृती करण्यापेक्षा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांची नेमणूक करून सार्वजनिक स्वच्छतेवर भर द्यायला हवा. निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी मुबलक संख्येत निर्माल्य कलश ठेवायला हवेत. भाविकांनीही निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकणे गरजेचे अाहेे. पालिकेने लक्ष दिल्यास असे चित्र दिसणार नाही. -सचिन पेखळे, भाविक

घाटांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्षच
सिंहस्थातभाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने काेट्यवधी रुपये खर्चून गोदावरीकाठी घाट विकसित केले. मात्र, सिंहस्थाच्या मुख्य पर्वण्या पार पडल्यानंतर या घाटांंच्या देखभालीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणारा घाट परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. विसर्जनानंतर या परिसरात महापालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज असताना प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशीही तसे हाेताना कुठेही दिसून अाले नाही.

नेमकी जबाबदारी काेणाची..?
नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला फटकारले आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठाेस पावले उचलण्यात अालेली नाहीत. नदीपात्र स्वच्छतेसाठी आरोेग्य विभागातर्फे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असतानाही त्यांची प्रत्यक्ष गैरहजेरी असल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. परिणामी, नदीपात्र स्वच्छ ठेवण्याबाबत नेमकी जबाबदारी काेणाची, याबाबतच प्रश्चचिन्हच आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाकडून ‘नदीपात्राची स्वच्छता ठेवा’, असे आवाहन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात निर्माल्य संकलन वा नदी परिसर स्वच्छतेसाठी काही उपाययाेजनाच केल्या गेल्या नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले. यामुळे गाेदावरी किनारी ठिकठिकाणी निर्माल्याचे ढिगारे अन‌् अस्वच्छता पसरल्याचे दिसून अाले. पालिकेच्या निष्क्रियतेवर हा प्रकाशझाेत...
{ नदीकाठपरिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे, त्याचे काय?
-मूर्ती संकलनाचे काम पूर्ण झाल्यावर महापालिका प्रशासनाद्वारे नदीकाठ परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
{ नदीकाठपरिसरात काठालगत अनेक मूर्ती ठेवलेल्या दिसून अाल्या, त्याचे काय?
-काठालगत ठेवण्यात आलेल्या मूर्ती संकलित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
{ घाटपरिसरही अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून, त्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत?
-प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता माेहिमेत घाट परिसराचीही स्वच्छता करण्यात येईल.
डॉ. विजय डेकाटे, आरोग्याधिकारी, मनपा
बातम्या आणखी आहेत...