आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉगर्सचे अाराेग्य असुविधांच्या ट्रॅकवर, पण गरज नियमित स्वच्छतेची...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या काही दिवसांपासून तपमानाचा पारा घसरू लागताच आरोग्यसंवर्धनाच्या दृष्टीने व्यायामप्रेमींसह खेळाडू, तरुण, ज्येष्ठ नागरिकांची जाॅगिंग ट्रॅकवर गर्दी वाढू लागली आहे. अाजघडीला शहरात अगदी बोटावर मोजण्याइतकेच जाॅगिंग ट्रॅक असल्याने अगदी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत तेेथे जाॅगर्सची गर्दी कायम असते. अशा स्थितीत महापालिका प्रशासनाने या जाॅगिंग ट्रॅकच्या नियमित देखभाल-स्वच्छतेकडे लक्ष देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र याउलट चित्र अाहे. अस्वच्छता, दुर्गंधीच्या विळख्यात अनेक जाॅगिंग ट्रॅक असताना महापालिकेचे कर्मचारी मात्र या ठिकाणी फिरकतही नसल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले आहे. गोल्फ क्लब मैदानावरील ट्रॅक काही प्रमाणात सुस्थितीत असला, तरी उर्वरित ठिकाणचे ट्रॅक दुर्लक्षितच अाहेत. जाॅगर्सना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, नियमित स्वच्छता हाेणे, अनेक दिवे बंद असणे, यामुळे जाॅगर्सची गैरसाेय हाेत असल्याच्याही तक्रारी अाहेत. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पडणारा झाडांच्या पालापाचोळा उचलला जात नसल्याने अस्वच्छता पसरली अाहे. परिणामी जाॅगर्सना दुर्गंधीचाही सामना करावा लागत अाहे.
सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज
अनेक जाॅगिंग ट्रॅकवर रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी असते. यात महिलांचीही संख्या माेठी असते. मात्र, अनेक ट्रॅकवर दिवे बंदच असतात, तर अनेक ठिकाणी टवाळखाेरांचा उपद्रव असताे. अशा परिस्थितीत महिला जाॅगर्सच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे बनले अाहे. जेणेकरून गैरप्रकारांना अाळा बसेल.

शरणपूर रोडवरील साधना निरामय हा प्रशस्त जाॅगिंग ट्रॅकदेखील महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षितच अाहे. ट्रॅकच्या दुतर्फा पालापाचोळ्याचे ढीग पसरले असून, जलवाहिनी फुटल्याने पसरलेल्या पाण्यामुळे हा कचरा कुजला अाहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला अाहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक शासकीय अधिकारीदेखील जाॅगिंगसाठी येत असतानाही कित्येक दिवसांपासून असलेले हे चित्र पालटत नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.

वि. वा. शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक समस्यांच्या गर्तेत
शरणपूर रोड येथे कुसुमाग्रज अर्थात, वि. वा. शिरवाडकर यांच्या नावाने उभारण्यात अालेला जाॅगिंग ट्रॅक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या आकर्षक दिव्यांची दुरवस्था झाली अाहे. परिसरात अस्वच्छता वाढली असून, दुर्गंधीही पसरली आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा वावर वाढल्याने सुरक्षितता धाेक्यात अाली अाहे.

शरणपूररोडवरील वि. वा. शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने ट्रॅकवर असा पालापाचोळा साचल्याचे दिसून येत असून, तशा स्थितीत व्यायामप्रेमींना जॉगिंग करावे लागते.