आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नपत्रिकेतून स्वच्छतेचा संदेश, लग्नातही नो प्लास्टिक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरामध्ये स्वच्छतेबाबत जागृत राहून काम करण्याची गरज निर्माण झालेली असतांना, नाशिकच्या दोन कुटूंबांनी लग्नाच्या पत्रिकेमध्ये स्वच्छतेच्या संदेशांचा समावेश केला आहे. दिंडोरी तालुक्यातील ग्रामसेवक किशोर भदाणे यांनी त्यांच्या स्वत:च्या लग्न पत्रिकेमध्ये स्वच्छता संदेशांचा समावेश करुन गावात प्रबोधन करण्याचे ठरविले. याच बरोबर काकुळते या वधूपक्ष परीवाराने यांनी हे लग्न वरपक्षाप्रमाणे स्वच्छतेचा संदेश देत प्लास्टिक मुक्त करण्याचे ठरविले आहे. 
 
या कुटूंबांशी लग्न पत्रिके संबंधी चर्चा केली असता, शहरामध्ये साधारण लोकांपर्यंत स्वच्छतेच्या संदेशांची माहीती असते. मात्र शहराजवळ असणा-या भागांमध्ये तितक्याशा सुचना आणि सुविधा पोहोचलेल्या नसतात. असे असतांना लोकांसाठी घरोघरी लग्न पत्रिकेतून अशा प्रकारचा संदेश पोहोचल्यास त्या लग्नपत्रिकेचा वेगळेपणा लोकांना ठासुन लक्षात रहातो. ही बाब लक्षात घेऊन भदाणे यांनी त्यांच्या लग्न पत्रिकेमध्ये आगोदर स्वच्छतेला नमन करुन स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छ भारत सुंदर भारत अशी चिन्ह वापरली आहेत. या नंतर गावांतील स्वच्छतागृहांची समस्या लक्षात घेऊन ‘शौचालय असेल ज्याच्या घरी , मुलगी देऊ त्याच्याच घरी’ हा संदेश लिहीला आहे. 

सरते शेवटी काव्य पक्तींच्या माध्यामातून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी हीच वंशाचा दिवा आहे.. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले। एका बीजापोटी तरु कोटी कोटी परी अंती ब्रह्म एकले।’ असे म्हणत आदर्श उभा केला आहे. या पत्रिकेमध्ये भरमसाठ नावे नाहीत, देव देवतांचे फोटो भरलेले नाहीत. मात्र स्वच्छतेपासून पर्यावरणापर्यंत सगळे प्रश्न हाताळले आहेत. 

वर पक्षाची ही पत्रिका पाहून दगा सुखदेव काकुळते यांनी मुलीचे लग्न प्लास्टिक मुक्त करण्याचे ठरविले आहे. (दि.१९) मे रोजी होणा-या या लग्नामध्ये प्लास्टिक वापरले जाणार नाही असे सांगून वर पक्षासारखीच पत्रिका वधू पक्षाने देखील तयार केली. गावामध्ये रहात असतांना हे थोडे धाडसी पाऊल वाटले, पण कुठेतरी सुरुवात व्हायला हवी असा विचार करुन लग्नात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक वापरले जाणार नाही याची काळजी घेणार असल्याचे कुटूंबीय सांगतात. 
 
प्लास्टिक मुक्त लग्नाची कल्पना.. 
^लग्नपत्रिकांमध्येवर पक्षाकडून स्वच्छतेचा प्रचार केला गेला, त्यांना साथ देण्यासाठी लग्न प्लास्टिकमुक्त करावे असा प्रस्ताव घरच्यांसमोर मांडला. यामुळे पत्रिकांसह आता प्लास्टिक मुक्तीसाठी देखील प्रयत्न करणार आहोत. लग्न पूर्णपणे प्लास्टिक मुक्त होणार आहे. कापडी वस्तू, लाकडी वस्तू आणि जास्तीत जास्त धातूच्या वस्तूंचा समावेश केला आहे. कुठेच प्लास्टिकचे ग्लास किंवा कचरा होण्यासारख्या वस्तु वापरणार नाही. किंबहुना प्लॅस्टिकच्या पिशव्याही दिसणार नाहीत. नयना काकुळते, वधू

पत्रिकांतून जनप्रबाेधन.. 
^मीस्वत:ग्रामसेवक असल्याने लोकांपर्यंत जाऊन त्यांना माहीती देत असतो. या निमित्ताने शहर आणि गावातील लोकांपर्यंत पोहोचता येणार होते. लग्नाच्या निमित्ताने होणा-या भेटी या स्वच्छतेसाठी उपयुक्त ठराव्यात अशा रितीने त्यांचा वापर करायचा ठरवला आहे. त्यामुळेच अाम्ही हे पाऊल उचलले अाहे. त्यालाच प्रतिसादही चांगला मिळताे अाहे. अशाच पत्रिकांची प्रथा सुरू झाली तरी स्वच्छतेबद्दल थाेडीतरी जागृती हाेईल असा विश्वास वाटताे. किशोरभदाणे, वर
बातम्या आणखी आहेत...