आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वण्यांनंतर विकासकामांचे तीन तेरा, निर्माल्य कलश धूळखात पडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात २३०० काेटी खर्च करून विकासकामे करण्यात अाली खरी, परंतु तीन शाहीस्नान पर्वण्या झाल्यानंतर मात्र महापालिका प्रशासनाने या विकासकामांकडे साेयीस्करपणे दुर्लक्ष केले अाहे. त्यामुळे अाता या कामांचा बाेजवारा उडण्यास सुरुवात झाली अाहे. वाकलेले पथदीप, तुटलेले दुभाजक, फुटलेले पदपथ, धूळखात पडलेले निर्माल्य कलश असे अाेंगळवाणे चित्र सध्या शहरात बघायला मिळत अाहे. विकासकामे केवळ पर्वण्यांसाठीच करण्यात अाली का, असा प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्य नाशिककरांना पडत असून, सिंहस्थ कामांचे श्रेय लाटणारे अाता या दुरवस्थेकडे लक्ष देतील का, असाही सवाल केला जात अाहे.
गाेदाघाटावर एकाच ठिकाणी तीन ते चार निर्माल्य कलश धूळखात पडून अाहेत. निर्माल्य कलशांअभावी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात अाहे. अहिल्याबाई हाेळकर पुलावर ठेवलेले निर्माल्य कलशही सध्या गायब अाहेत. शहरातील कचरा अाणि निर्माल्य सार्वजनिक ठिकाणी पडून राहिल्यास ते कुजून अाराेग्याला धाेका निर्माण हाेऊ शकताे. ही बाब लक्षात घेऊन कचरा अाणि निर्माल्यासाठी गाेदावरीसह शहरात ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात अाले अाहेत. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी हे कलश कचरा अाणि निर्माल्याने अक्षरश: अाेथंबून भरले अाहेत. परंतु, अातील कचरा काढण्याची तसदी स्वच्छता कर्मचारी घेतच नसल्याने ‘निर्माल्य कलश तेथे रस्त्यावर कचरा’ अशी परिस्थिती अाज झाली अाहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गाैरी पटांगणाचे सुशाेभीकरण करण्यात अाले. येथील कमानींची डागडुजी करतानाच रंगरंगाेटीही करण्यात अाली, तसेच परिसराची साफसफाई सपाटीकरणही करण्यात अाले. पर्वण्या झाल्यानंतर मात्र लगेचच परिसरात अतिक्रमण करण्यात अाल आहेे. संबंधित अतिक्रमणधारक याच परिसरात कपडे वाळत घालत असल्यामुळे या सुंदर परिसराला असे ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे.
टाकळीराेड भागात कमाेड पडले बेवारस
सिंहस्थपर्वण्यांसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांच्या व्यवस्थेसाठी माेठ्या प्रमाणात सार्वजनिक शाैचालये बांधण्यात अाली हाेती. सिंहस्थानंतर ही शाैचालये काढून घेण्यात अाली. टाकळीराेड परिसरात तर शेकडाे कमाेड धूळखात पडून असून, त्यातील अनेक कमाेड चाेरीस गेले अाहेत.
बाेटीने सफाईकाम बंद
गाेदावरी नदी स्वच्छतेसाठी काेट्यवधी खर्च करून राेबाेटिक मशिन खरेदी करण्यात अाले हाेते. या मशिनद्वारे गाेदावरीची स्वच्छता करण्यात येणार हाेती. परंतु, या मशिनला अनेक मर्यादा असल्याने बाेटीद्वारे स्वच्छतेचे काम पालिका प्रशासनाने सुरू ठेवले हाेते. मात्र, गेल्या दाेन महिन्यांपासून प्रशासनाने हे कामदेखील थांबविले अाहे.
गोदाघाटावरील कारंजा बंद
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गाेदाघाटावरील कारंजा दुरुस्त करण्यात अाला. या कारंजामुळे गाेदाघाटाच्या साैंदर्यात भर पडली हाेती. सेल्फी अँगलसाठी पर्यटक या कारंजाचा उपयाेग करीत असतानाच गेल्या चार दिवसांपासून हा कारंजाही नादुरुस्त अाहे. दिवाळीच्या काळात येणाऱ्या पर्यटकांनाही या कारंजाच्या साैंदर्यापासून मुकावे लागत अाहे.
कोट्यवधींचे घाट बनले बकाल
सिंहस्थ कुंभमेळ्यात रामकुंड परिसरातच भाविकांची स्नानासाठी गर्दी हाेऊ नये, म्हणून नव्याने सात घाट बांधण्यात अाले. शाहीस्नान पर्वणीप्रसंगी होणाऱ्या गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या घाटांची निर्मिती करण्यात अाली. एकूण २७४० मीटर लांबीच्या या घाटांसाठी जलसंपदा विभागाने १३८.९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पर्वण्यांनंतर या घाटांची देखभाल स्वच्छता व्यवस्थित केली जात नसल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरून बकाल स्वरूप आलेले दिसत अाहे. तसेच, अनेक ठिकाणचे घाट मद्यपींचे अड्डे बनले अाहेत.
शहरातील दुभाजकांची दुरवस्था
सिंहस्थाच्यानिमित्ताने शहरातील रस्त्यांवर सुमारे ४०० काेटी इतका खर्च करण्यात अाला. त्यात रस्त्यांवरील दुभाजकांची डागडुजी करण्यात अाली. बहुतांश ठिकाणी नवीन दुभाजक बांधण्यात अाले. अाज मात्र पेठराेड परिसरात दुभाजकांची प्रचंड दुरवस्था झाल्याचे दिसत अाहे. तिडके काॅलनी परिसरातील दुभाजकांचीही सध्या वाताहत झालेली दिसत अाहे.
काॅलेज राेडला पथदीप वाकला
काॅलेजराेडवरून बाॅइज टाऊन शाळेकडे जाताना रस्त्याच्या मधाेमध नवे पथदीप लावण्यात अाले अाहेत. माॅडेल राेडला शाेभेसे असे हे पथदीप असले तरीही त्यातील अग्रभागाचा पथदीप अक्षरश: वाकला अाहे. हा पथदीप कधीही रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर पडण्याची भीती अाहे. पथदीप वाकून महिना लाेटला तरीही अद्याप त्याकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही.
गोदापात्रात पाणवेलींचा गालिचा
ज्यागाेदावरीमुळे शहरात सिंहस्थ कुंभमेळा भरताे, त्या नदीकडेच प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले हाेते. केवळ दुर्लक्षच नव्हे तर नदीपात्र प्रदूषित करण्यात प्रशासनाचाच माेठा हात हाेता. ही बाब उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर गाेदापात्रात थेंबभरही सांडपाणी जाऊ नये, अशी व्यवस्था करण्याचे न्यायालयाने महापालिकेला अादेश दिले. पर्वण्यांच्या काळात या अादेशाचे काटेकाेरपणे पालन करण्यात अाले. पर्वणी झाल्यानंतर मात्र काही ड्रेनेज लाइन नदीपात्रात छुप्या पद्धतीने साेडण्यात अाल्या. त्यातून येणारे सांडपाणी पाणवेली अाणि शेवाळला पाेषक असल्याने सध्या नदीपात्रात सर्वत्र हिरवाईचा गालिचा पसरलेला दिसत अाहे.