आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर मिळणार चोरी गेलेल्या दुचाकी, नाशिक पोलिसांचे नवीन संकेतस्थळ लवकरच कार्यान्वित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर आणि परिसरातून चोरीस गेलेली दुचाकी वाहने मिळण्याची शक्यता फारच कमी असते. काही वाहन मिळाल्यास पोलिस ठाण्यात ते जमा केले जाते. यातील बहुतांश वाहने बेवारस म्हणून सोडून दिलेले असतात. या वाहनांचा मालक शोधण्यात पोलिसांना तांत्रिक अडचणी निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी पोलिस दलाने अशा बेवारस मिळालेल्या वाहनांची माहिती देणारे संकेतस्थळ सुरू केले आहे. या आधारे एका क्लिकवर मालकास या वाहनांची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.

पोलिस ठाण्यामध्ये चोरी, अपघात आणि बेवारस आढळून आलेल्या वाहनांची नोंद केली जाते. या वाहनांचा मालक मिळाल्याने बहुतांशी वाहने भंगार होतात. पोलिसांना मिळालेली वाहने मूळ मालकांना तत्काळ मिळावीत, यासाठी पोलिस प्रशासनाकडे ठोस उपाय नसल्याने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लिलाव करून या वाहनांची विल्हेवाट लावली जाते. या किचकट प्रक्रियेवर मात करण्यासाठी नाशिक पोलिसांनी संकेतस्थळ निर्माण केले आहे. या संकेतस्थळाच्या आधारे एका क्लिकवर वाहन मालकास आपले वाहन कोठे आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे. आडगाव पोलिस आणि भुजबळ नॉलेज सिटीच्या सहकार्याने हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.

शहर आणि परिसरात बेवारस मिळालेल्या सर्व दुचाकी वाहनांची माहिती या संकेतस्थळावर देण्यात येणार असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन ते तीन दविसांत या संकेतस्थळाचे पोलिस आयुक्त आणि निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते औपचारिक उद‌्घाटन केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या संकेतस्थळामुळे ज्यांची वाहने चाेरीस गेली आहेत किंवा हरवली आहेत त्यांना ही वाहने शोधण्याची संधी मिळणार आहे.

सर्व विभागात जोडणी
- अकरापोलिस ठाणे, परिमंडळ गुन्हे शाखा या विभागांना संकेतस्थळ जोडणी केले आहे.
असे असेल संकेतस्थळ
- नाशिक पोलिस संकेतस्थळावर जाऊन मोटर व्हेइकल क्लिक करावे. संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन आरसी बुकमधील रजिस्ट्रेशन नंबर, चेसी नंबर, वाहन नंबर आणि इतर माहिती भरल्यास ते वाहन कुठल्या पोलिस ठाण्यात आहे याची माहिती मिळेल.
- संकेतस्थळ निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलिस ठाण्यात नोंद आणि जमा वाहनांची वर्षानुसार सर्व माहिती संकेतस्थळावर भरण्याचे काम सुरू आहे.
- ग्रामीण पोलिस दलाचा समावेश विचाराधीन प्रायोगिकतत्त्वावर चोरीच्या वाहनांची शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील माहिती संकेतस्थळावर मिळणार आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या सर्व ३६ पोलिस ठाण्यांनाही समाविष्ट करण्याचे विचाराधीन आहे.