सिडको-अंबडगाव, दत्तनगर येथील देशी दारूचे दुकान बंद करावे, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने मंगळवारी अंबड पोलिसांकडे केली. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांना निवेदन देतानाच प्रसंगी आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला.
देशी दारूच्या दुकानामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपी दारू पिऊन गोंधळ घालत असतात. महिला व मुलींची छेडछाड करणे, शिवीगाळ करणे, आपापसातील भांडणामुळे परिसरातील वातावरण बिघडत आहे. याच भागात धार्मिक ठिकाणे आहेत. त्याचा त्रास भक्तांना सहन करावा लागतो. दारूचे अनेक गंभीर परिणाम होत असताना अनेक लोक व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या विद्यार्थी सेनेने पुढाकार घेत निवेदन दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष अजिंक्य गिते, शहराध्यक्ष मुकेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मोरे, अरुण दातीर, याग्निक शिंदे, बाळा निगळ, जॉय कोतवाल, आनंद शिरसाठ, तुषार मटाले, अमोल मोरे, गोविंद डांगे, गणेश देसाई, गणेश दातीर, नीलेश आढाव आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
अंबड हद्दीतील अवैध धंदे कधी बंद होणार
राजकीय आर्शय
देशी दारू दुकानांना राजकीय आर्शय मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळेच मागणी करूनही ते बंद केले जात नाहीत. देशी दारूच्या धंद्यात राजकारणी व पोलिसांची आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
गुंडगिरी वाढली
काही दिवसांपूर्वीच राणा प्रताप चौक भागातील फुले गार्डन येथे 25 ते 30 गुंडांनी दहशत निर्माण केली होती. हातात तलवारी व लाकडी दंडुके घेत हे गुंड नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होते. या प्रकाराबाबत नागरिकांनी पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांना कळविले. मात्र, ते येईपर्यंत गुंड पसार झाले होते. कामटवाडे, उत्तमनगर भागात घरफोडीच्या घटनांमध्येही वाढ झाली असून, पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अंबडगाव, दत्तनगर येथील देशी दारूचे दुकान बंद करावे, अशा मागणीचे निवेदन अंबड पोलिसांना देताना पदाधिकारी.