आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमधील कालिदासमध्ये अवतरले क्लोज सर्किट कॅमेरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कालिदास कलामंदिरात लावण्यांच्या नावाने सुरू असणारा धांगडधिंगा रोखण्यासाठी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात येणार असून, त्याचे प्रात्यक्षिक नुकतेच करण्यात आले. अंधारातील हालचालीही कॅमेर्‍यात बंदिस्त होण्यासाठी डिजिटल कॅमेरे बसविण्याचा विचार प्रात्यक्षिकानंतर प्रशासन करीत आहे.

कालिदास कलामंदिरात दर बुधवारी लावण्यांचा कार्यक्रम होतो. लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी पालिका अशा कार्यक्रमांना परवानगी देत असली तरीही प्रत्यक्षात या कार्यक्रमांना ‘डान्स बार’ सारखे स्वरूप येत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले होते. या कार्यक्रमात बहुतांश प्रेक्षक कलामंदिरातच मद्याचे पेग रिचवत असल्याचेही पुढे आले होते. त्यानंतर अशा कार्यक्रमांचा निषेध करण्यात आला. महापौर अँड. यतिन वाघ यांनी कार्यक्रम नियमावलीत बदलाचे आदेश देतानाच कलामंदिरातही सुधारणा करण्याची सूचना केली. त्यात सीसी कॅमेरे लावण्याच्या सूचनेचा समावेश होता. त्यानुसार कालिदासमध्ये दोन सी सी कॅमेरे लावून लावणीच्या कार्यक्रमात प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी निदर्शनास केवळ दोन कॅमेर्‍यांनी प्रश्न सुटणार नाही हे निदर्शनास आले. त्यासाठी कलामंदिरात अधिक कॅमेर्‍यांची गरज आहे. अंधाराचा फायदा घेत खुच्र्यांचे नुकसान करणारे व मद्यपान करणार्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळे अंधारातील हालचालीही दिसू शकतील, असे चित्रीकरण करणारे डिजिटल कॅमेरे लावण्याची गरज या वेळी अधिकार्‍यांनी व्यक्त केली. बुधवारी झालेल्या कार्यक्रमाचे चित्रीकरण सीसी कॅमेरांच्या माध्यमातून करण्यात आले असून, लवकरच ते आयुक्तांना दाखविण्यात येणार आहे; त्यानंतर यासंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.