आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Chavan Wife Satwashila Chavn In Yeola For Paithani Shoping

मुख्यमंत्र्यांच्या ‘होम मिनिस्टर’नी केली पैठणींची मनसोक्त खरेदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला - दुष्काळी परिस्थितीत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींकडूनच येवल्यात महाराष्ट्राच्या ‘राजवस्त्रा’ची मनसोक्त खरेदी केली गेली. मनाजोगी शॉपिंग उरकल्यानंतर निवांत क्षणात जनावरांच्या छावण्यांसाठी निवेदनाचे आर्जव घेऊन आलेल्या काँग्रेस शिष्टमंडळापुढे ठळक उपस्थिती टाळण्यासाठी मॅडमनी चक्क दुष्काळाचे निमित्त करत छायाचित्र घेण्यास नकार दिल्याने सगळेच बुचकळ्यात पडले. मनसोक्त खरेदीनंतर दुष्काळाचे आलेले भान चर्चेचा विषय ठरला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्त्वशीला चव्हाण या शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता शिर्डीहून आपल्या खासगी लवाजम्यासह येवल्यात दाखल झाल्या. त्यांनी शासकीय विश्रामगृहावर न जाता थेट अंगणगाव येथील पैठणी विणकर प्रशिक्षण केंद्र गाठले. येथे फोटोसेशन व शूटिंगसाठी आलेल्या मीडिया प्रतिनिधींना प्रशिक्षण केंद्राच्या संचालकांनी सुरक्षा यंत्रणेच्या सूचनेनुसार मज्जाव केला. सुमारे चार तास प्रशिक्षण केंद्राची पाहणी, खरेदी या वेळी सुरू होती. शहर पोलिस दलाचे पथक गेले असता हा खासगी दौरा असल्याने संरक्षणाची गरज नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसही या केंद्रावरून माघारी फिरले. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृहावर चव्हाण यांचा लवाजमा परतल्यावर शाकाहारी भोजनाचा जसा मेनू आलेला होता तो महसूल यंत्रणेमार्फत सज्ज ठेवण्यात आला होता. तर शहर पोलिसांनीही बंदोबस्तासाठी एक बंदूकधारी पोलिस तैनात ठेवला होता.

काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या भेटी
शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी भेटीसाठी वाट पाहून थकलेल्या व घरी परतलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता सत्त्वशीला चव्हाण यांची भेट घेतली. दुष्काळी परिस्थिती असल्याने तालुक्यात चारावाटप छावण्या सुरू करण्यात याव्यात व विविध शासकीय कमिट्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नेमणुका कराव्यात, या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या वेळी फोटो काढण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी केली असता, ‘फोटो काढू नका, दुष्काळ आहे’ अशी सूचना स्वत: मॅडमांनी दिली.

दिवसभर शॉपिंगमध्ये व्यग्र
सत्त्वशीला यांनी एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांना दुष्काळाचा बहाणा सांगितला, तर शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत सोनी पैठणी, तर दुपारी 1 ते 3 पर्यंत कापसे पैठणी येथे खरेदी केली. त्यांच्या दौर्‍याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येथील तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. शासकीय विश्रामगृहावर दुपारी 3.30 नंतर भोजनाचा आस्वाद घेऊन त्या पुण्याकडे रवाना झाल्या.