आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार रेल्वेचा: मंडल प्रबंधक आले, कुणी नाही पाहिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी आलेले रेल्वेचे भुसावळ मंडल प्रबंधक नाशिकरोडला आले. त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासन आधीपासूनच अगोदरपासून रेल्वे स्थानकावर सज्ज होते. प्रबंधकांचे आगमन झाले. मात्र, ते त्यांच्या कॅरेजमधून बाहेर आले नाही किंवा त्यांनी काही संदेशही दिला नाही. चार तास थांबूनही त्यांचे कुणालाच दर्शन न झाल्याने ‘प्रबंधक आले, मात्र कुणी नाही पाहिले’ असे म्हणण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवनवीन कार्यपद्धती स्थानिक प्रशासनास अनुभवास येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी नाशिक दाैऱ्यावर हाेते. त्यांच्या उपस्थितीत दुपारी सिंहस्थ कामाची आढावा बैठक होणार असल्याने भुसावळ मंडलाचे रेल्वे प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता स्वतंत्र कॅरेजमधून भुसावळ-दादर एक्स्प्रेसने नाशिकरोडला दाखल झाले. ते येणार म्हणून स्थानिक प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी गाडीच्या वेळेपूर्वी त्यांच्या स्वागतासाठी स्थानकावर सज्ज होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पथकासह प्रबंधकांचे आगमन झाले. स्वागतासाठी उपस्थित अधिकारी कर्मचारी ते गाडीतून कधी उतरतात याची वाट बघत होते. एक, दोन, तीन तास झाले तरी प्रबंधक बाहेर आले नाही किंवा स्थानकावर ताटकळत उभ्या असलेल्यांना त्यांनी काही संदेशही पाठवला नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा कामाचा खोळंबा झाला, शिवाय काही तास व्यर्थ गेले, जेवणाची वेळ टळून गेली.
प्रबंधक बैठकीच्या वेळी दुपारी २.४५ वाजता बाहेर पडून रवाना झाले. अधिकारी मात्र ताटकळून आपआपल्या कामाला नाक-तोंड मुरडत रवाना झाले. रेल्वे बोर्डाचे चेअरमन दोन महिन्यांपूर्वी पहाटेच्या अंधुक प्रकाशात नाशिकरोडला आले होते. मात्र, कोणाशीच संवाद साधता ते थेट त्र्यंबकला रवाना झाले. तेव्हाही काहीसा असाच अनुभव आला होता. गेल्या आठवड्यात आलेल्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांच्या अर्धा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी दहा इनाेव्हा दिमतीला होत्या. यापूर्वी आजी-माजी भुसावळ मंडल प्रबंधकांनी सिंहस्थाच्या कामाचा पाहणी दौरा केला. त्यासाठी त्यांनी ‘कामात काम मुक्तिधाम’ या म्हणीनुसार रविवार निवडला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची सुटी वाया गेली.
सात तासांच्या प्रतीक्षेनंतरही भेट झालीच नाही
रेल्वेट्रॅकच्या दुरुस्तीचे काम करणारे जवळपास ५० गँगमन कामात येणाऱ्या अडीअडचणींचे निवेदन भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांना देण्यासाठी सकाळी वाजेपासून नाशिकरोड स्थानकावर उपस्थित होते. तब्बल सात तास वाट पाहूनही प्रबंधक त्यांना भेटले नाहीत. तीन वाजेच्या सुमारास गाडीबाहेर पडून प्रबंधक गुप्ता वाहनाने मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी थेट रवाना झाले. त्यामुळे गँगमन्सना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...