आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षण समितीला ‘सीएम’ची स्थगिती, नवनिर्वाचित सदस्यांमध्ये पसरली नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महासभेने अलीकडेच स्थापन केलेल्या शिक्षण समितीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती आणली आहे. यासंदर्भात शिक्षण मंडळाच्या यापूर्वीच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सदस्यांनी नियमांसह मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्याने समितीला स्थगिती देण्यात आली. मात्र, या स्थगितीने नवनिर्वाचित सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
महापालिकेच्या शाळांसाठी पूर्वी शिक्षण मंडळ अस्तित्वात होते. शासनाने शिक्षण मंडळ बरखास्त करून त्या जागी शिक्षण समिती स्थापन करण्याचा आदेश काढला. त्यानुसार शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले होते. परंतु, तत्पूर्वीच महापालिकेने शिक्षण मंडळ सदस्यांची नियुक्ती केली होती. शासनाच्या आदेशाने या नियुक्तीला पूर्वीच्या सदस्यांकडून आव्हान दिले गेले. महासभेत १६ नगरसेवकांचा समावेश असलेल्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर आता सभापतिपदासाठी निवडणूक होणार होती. त्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली होती. सत्ताधारी पक्षातील काही नाराजांसह इतर पक्षातील इच्छुकांनी आपल्या परीने फिल्डिंग लावली होती.
दरम्यानच्या काळात शासनाचा आणखी एक आदेश आला. त्यात असे म्हटले होते की, शिक्षण मंडळ सदस्यांची यापूर्वी नियुक्ती केली असेल तर त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरच शिक्षण समिती स्थापन करण्यात यावी. याच पार्श्वभूमीवर पूर्वीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नाशिक येथे भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. स्थगितीने नवनिर्वाचित सदस्यांच्या आनंदावर विरजण पडले. काही सदस्य कायदेशीर सल्ला घेण्यासाठी धावपळ करत असल्याचीही चर्चा आहे. प्रथमच या समितीमध्ये सर्व सदस्य नगरसेवक आहेत.
पदरी हिरमोड
पदे मिळालेल्या नगरसेवकांची या समितीवर वर्णी लावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, समितीला मिळालेल्या स्थगितीने त्यांचा हिरमोड झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...