नाशिक; विविध क्षेत्रांसह राजकीय क्षेत्रांप्रमाणेच सहकारक्षेत्रातही महिलांना ५० टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा अॅड. अंजली पाटील यांनी केली.
पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित सहकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी महिला नागरी सहकारी पतसंस्थांचे प्रश्न उपायांबाबत सरकारकडे विविध मागण्या केल्या. व्यासपीठावर सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार जयंत जाधव, आमदार प्रा. देवयानी फरांदे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, अॅड. ल. जी. उगावकर, अजय ब्रह्मेचा, भास्करराव कोठावदे, शशिताई अहिरे, कल्याणी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माधवीताई बुरकुले, लक्ष्मण सावजी, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, तालुका उपनिबंधक जी. जी. मावळे आदी होते. महिलांना कर्ज देण्यासाठी पुरुषांच्या नावावर तारण घ्यावे लागते, म्हणून महिला पतसंस्थांमध्ये २० टक्क्यांपर्यंत ‘अ’ वर्ग सभासद करण्यास परवानगी मिळावी, कुशल मनुष्यबळासाठी स्वतंत्र निवड नियुक्ती पद्धती अंमलात यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. या मागण्या सरकारदरबारी मांडण्याची ग्वाही आमदार फरांदे यांनी दिली.
सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या या संस्थांचा गौरव
आदर्शमहिला नागरी सहकारी पतसंस्था, आळेफाटा, अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था, श्रीरामपूर आणि सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था, पुणे यांचा या सोहळ्यावेळी सर्वेात्कृष्ट संस्था म्हणून गौरव करण्यात आला.