आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतपेय, थंड पाण्याची एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील विविध हॉटेल्समध्ये शासन आदेशाची पायमल्ली करीत ‘एमआरपी’पेक्षा जादा दराने शीतपेय मिनरल वॉटर विक्री करून ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे. मुळात एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित असतानाही त्यांच्याकडून अपुर्‍या कर्मचारी संख्येचा धिंडोरा पिटवत कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र नाहक कात्री बसत आहे. यात शासकीय संस्थांच्या आवारात सुरू असलेल्या कॅन्टीनचालकांचादेखील समावेश असल्याचे दिसून आले आहे. या सर्व प्रकारावर ‘डी.बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...

नाशिकचे तपमान ४० अंशांपर्यंत पोहोचू लागले आहे. जिवाची काहिली करणार्‍या रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांची थंड पाणी किंवा शीतपेयांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे सर्वत्रच बाटलीबंद पाणी शीतपेय विक्री तेजीत आहे. या तेजीचा फायदा घेत विक्रेत्यांकडून नागरिकांची लूट सुरू आहे. शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय या शासकीय तसेच, काही अशासकीय कार्यालयांतील कॅन्टीनसह बाजारपेठेतही बाटलीबंद पाणी शीतपेयांची विक्री करताना शासनाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवून एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री केली जात असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत आढळून आले आहे.

याठिकाणांवर होतेय लूट
जिल्हा न्यायालयाच्या आवारात न्यायालयीन कामकाजासंदर्भात दररोज लेकांची ये-जा सुरू असते. न्यायालयात कार्यरत असलेल्या शेकडो वकील अणि कर्मचार्‍यांसह पक्षकारांचाही याठिकाणी राबता असतो. सकाळपासून न्यायालयीन कामासाठी आलेल्या पक्षकाराचे काम केव्हा संपेल याचा नेम नसतो. त्यामुळे पक्षकार, वकील न्यायालयीन कर्मचार्‍यांना साेयीचे व्हावे, यासाठी शासकीय जागेतच कॅन्टीन उभारण्यात आली आहे. न्यायालयातील कर्मचार्‍यांच्या पतसंस्थेने ही कॅन्टीन चालविण्यास घेऊन पोटभाडेकरूंच्या ताब्यात दिल्याची तक्रार वकिलांनी केली आहे. मात्र, पतसंस्थेच्या नावाखाली कॅन्टीन चालविणार्‍या या व्यावसायिकाने २० रुपयात कोल्ड्रिंक्स विक्री सुरू केली आहे. १५ रुपये किमतीचे कोल्ड्रिंक्स २० रुपयाला व्रिकी होत असून, विशेष म्हणजे तेथे कोणत्याही वस्तूचे बिलदेखील दिले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कॅन्टीन चालकाच्या मनमानीला खुद्द न्यायालयात कामकाज करणारे वकीलही त्रस्त झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

प्रवाशांची उघडपणे फसवणूक
नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या परिसरासह रेल्वेतदेखील पाण्याचा पैसा केला जात आहे. स्टेशनच्या परिसरातही एमआरपीपेक्षा जादा दराने पाण्याची शीतपेयांची विक्री केली जाते. तसेच रेल्वेत तर मिनरल वॉटरच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास फसवणूक केली जात आहे. कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले साधे पाणी मिनरल वॉटर म्हणून ग्राहकांना दिले जाते. याबाबत रेल्वेचे संबंधित विभागाचे अधिकारी रेल्वे पाेलिस बेखबर असल्याचा आव आणतात, प्रत्यक्षात मात्र आर्थिक देवाण-घेवाणीतून ही लूट राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारीदेखील काही प्रवाशांनी ‘डी. बी. स्टार’कडे केल्या आहेत. एसटी कॅन्टीन, तसेच बसेसच्या थांब्यावरही प्रवाशांना जादा दराने शीतपेय आणि मिनरल वॉटरची विक्री केली जाते. महामार्गांवरील बस थांबत असलेल्या काही विशिष्ट हॉटेल्सवर, तसेच किरकोळ विक्रेते धाब्यांवरही याहून वेगळी परिस्थिती नाही. याठिकाणी कधी कारवाईच होत नसल्याने खुलेआम नागरिकांची फसवणूक सुरू असते.

न्यायाधीशांकडे लेखी तक्रार
न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये एमआरपीपेक्षा जादा दराने शीतपेय मिनरल वॉटरची विक्री केली जाते. ही कॅन्टीन न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेस देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी ठेवलेल्या पोटभाडेकरूंकडून नागरिकांची लूट सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा न्यायाधीशांकडे वकिलांनी लेखी तक्रार करून नागरिकांची ही लूट थांबवण्याची मागणी केली आहे.

बाजारपेठेत चढ्या भावानेच विक्री
शहरातील विविध भागांमधील हॉटेल्स दुकानांमध्येही एमआरपीपेक्षा जादा दरानेच पाण्याची शीतपेयांची विक्री केली जात आहे. एखाद्या ग्राहकाने याबाबत जाब विचारल्यास कुलिंग चार्जेससह लाईटबिल कर्मचार्‍यांचे वेतन अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांची बोळवण केली जाते.

‘अन्न औषध’कडून व्हावी कारवाई
पाण्याच्याशीतपेयाच्या गुणवत्तेबाबत अन्न आैषध प्रशासन विभागाकडून कारवाई हाेणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्यापर्यंत तक्रारी जात नाहीत. यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता अन्न सुरक्षा अधिकार्‍यांना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले.

न्यायालयीन आचारसंहितेमुळे माहिती देता येत नाही
जिल्हा न्यायालयाच्या कॅन्टीनसंदर्भात उपहारगृह व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी एस. आर. भाेजने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी न्यायालयीन कर्मचारी असून, न्यायालयाच्या आचारसंहितेमुळे मला न्यायालयीन आवाराच्या आतील माहिती देता येत नसल्याचे सांगून हतबलता व्यक्त केली.

खाद्यपदार्थांची गुणवत्ता नाही...
न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थांची गुणवत्तादेखील राखली जात नाही. न्यायदेवतेच्या मंदिरातच अशा प्रकारे लूट होत आहे. नियमाप्रमाणे ही कॅन्टीन संस्थेने चालविणे अपेक्षित आहे. अ‍ॅड.शिवाजीराव जाधव

जिल्हा न्यायाधीशांकडे केली लेखी तक्रार
न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीन चालकाकडून एमआरपीपेक्षा जादा दराने शीतपेय मिनरल वॉटरची विक्री केली जात आहे. ही कॅन्टीन न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेस देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी २५ ते ३० हजार रुपये भाडेतत्त्वावर पोटभाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्याकडून नागरिकांची लूट केली जात आहे. यासंदर्भात मी जिल्हा न्यायाधीशांकडे लेखी तक्रारदेखील केली आहे. अ‍ॅड.लीलाधर जाधव

थेट प्रश्न : एम. पी. ताजणे, उपनियंत्रक,वैधमापन शास्त्र विभाग
शहरात सर्वत्र एमआरपीपेक्षा जादा दराने शीतपेय बाटलीबंद पाण्याची विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. यावर नियंत्रण आणण्याचे काम कुणाचे?
एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर आमच्या विभागाकडूनच कारवाई केली जाते. अशी विक्री कुठे होत असल्यास आम्हाला कळवा, संबंधित व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई केली जाईल.

- तक्रारीची प्रतीक्षाकरण्यापेक्षा थेट कारवाई का नाही?
आमचे निरीक्षक नियमितपणे दर महिन्याला तपासणी करत असतात. त्यामुळे आम्ही तक्रारीची प्रतीक्षा करतो, असे नाही. सर्वच ठिकाणांवर निरीक्षक पोहोचू शकत नाही. त्यामुळे तक्रार केल्यास ठराविक ठिकाणी निरीक्षकांना पाठविता येईल.

- अशा व्यावसायिकांवर काय कारवाई होऊ शकते?
एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करणार्‍या व्यावसायिकांना दोन हजार रुपयांचा दंड करता येतो. शिवाय त्यांच्यावर खटलाही दाखल केला जाऊ शकतो.