आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व उभारणीसाठी कॉलेज निवडणुका हव्याच; नेते मंडळींचा एकमुखी सूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दोन दशकांपासून नवनेतृत्व पुढे येण्याची प्रक्रिया जवळपास बंद झाली आहे, अशी खंत व्यक्त करतानाच महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू झाल्यास नेतृत्व उभारणीस मोठा हातभार लागेल, असा सूर ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित ‘राउंड टेबल’ उपक्रमाद्वारे व्यक्त झाला. निवडणुका झाल्यास मार्गदर्शकाची भूमिका बाह्य राजकीय शक्तींनी बजवावी, तसेच गुन्हेगारी वर्तन असलेल्यांना त्यात थारा देऊ नये, असे एकमुखी मत सध्या राजकारणात सक्रिय असलेल्या आणि पूर्वी महाविद्यालयातील जीएस, सीआर पद भूषविलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.

गुन्हेगारी वर्तन वाढीस लागल्याचे कारण दर्शवित 1994पासून महाविद्यालयीन निवडणुकाच बंद करण्याचे धोरण तत्कालीन राज्य शासनाने स्वीकारले होते. त्यानंतर चांगले नेतृत्व पुढे येत नसल्याची जाणीव राजकीय पक्षांना झाली आणि पुन्हा एकदा या निवडणुका घेण्याची चर्चा विविध पातळ्यांवरून सुरू झाली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनीही निवडणुका घेण्याचा विचार करता येईल, असे सांगून विद्यार्थी संघटनांच्या मागणीला सर्मथन दिले आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात ‘राउंड टेबल’च्या माध्यमातून ‘महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्यात याव्यात का?’ या विषयावर झालेल्या साधकबाधक चर्चेचा हा सारांश..

अशा आल्या सूचना
>निवडणुकीत सहभाग घेऊ इच्छिणार्‍यांसाठी किमान गुणवत्तेची अट असावी.
>निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रचाराचा कालावधी कमी असावा.
>निवडणूक काळात महाविद्यालयांमध्ये क्लोजसर्किट कॅमेरे बसवावेत.
>संधिसाधू पुढार्‍यांना या निवडणुकीपासून बाजूला ठेवावे.
>महाविद्यालयाच्या जवळील पीएसआयचा निवडणुकीवर अंकुश असावा.
>निवडणुका टप्प्याटप्प्याने घ्याव्यात.
>इतर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत पैशांची उधळपट्टी होऊ नये.
>प्रचारात शैक्षणिक मुद्यांवरच भर असावा.
>ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी निवडणुकीत थेट सहभाग घेऊ नये.
>महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या सोडविण्यासाठी व्यवस्था असावी.
>निवडणुका होणार्‍या महाविद्यालयांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त असावा.

निवडणुकांतून नेतृत्व विकासास चालना
महाविद्यालयीन निवडणुकांतून विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. मी स्वत: मागच्या बाकावरचा; पण एचपीटी महाविद्यालयात मला जी.एस. म्हणून निवडणूक लढवायची संधी विद्यार्थ्यांनी दिली. निवडून आलो. सुभाष खटोड, सुरेश भटेवरा यांसारखा मोठा ग्रुप त्यातून तयार झाला. पूर्व पदवीतून झालेला पहिला जी.एस. मी होतो. महाविद्यालयीन निवडणुका घेताना त्यावेळची आणि आजची स्थिती याचा विचार करायला हवा. त्यावेळी जबाबदार लोकं निवडणुकांवर लक्ष ठेवून असायचे. सर्वच पक्ष आणि संघटनांना पुढाकार घ्यावा लागेल.
-शाहू खैरे, नगरसेवक, माजी जी.एस., एचपीटी महाविद्यालय

चांगले संघटन तयार होते
महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात, याकरिता भारतीय विद्यार्थी सेनेने न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. हाणामारी, भानगडी या कारणांमुळे निवडणुका राज्य सरकारने बंद केल्या होत्या; पण वास्तवत: निवडणुका बंद झाल्यानंतर हे प्रकार महाविद्यालयांच्या आवारातून बंद झाले का? या निवडणुकांमधून एक चांगले संघटन तयार होते. सांघिक भावना आणि चांगले नेतृत्व तयार होते. निवडणुकांमध्ये काही गडबड गोंधळ होऊ नये, याकरिता सर्वच राजकीय पक्षांना नैतिक जबाबदारी मात्र घ्यावी लागेल. त्यानंतर निवडणुका शांततेत पार पडतील.
-अजय बोरस्ते, नगरसेवक, माजी जी.एस., के. के. वाघ महाविद्यालय

विशिष्ट विचारधारेवर मंथन
महाविद्यालयीन निवडणुकांमधून ज्ञानही वाढते. एका विशिष्ट विचारधारेचा स्वीकार विद्यार्थिदशेतच व्हायचा, त्यानंतर विद्यार्थी त्यावर विचारमंथन करायचा आणि मनापासून ती विचारधारा स्वीकारायचा. त्यातून तो वैचारिकदृष्ट्या विकसित होत राहतो. त्यामुळे निवडणुका घेणे गरजेचे असून, त्यासाठी आजचे आधुनिक तंत्रज्ञान पाहता ई- व्होटिंग, प्रचाराला कमी वेळ यांसारख्या पर्यायांचा विचार होऊ शकतो. गुंडगिरीचे कारण सांगून निवडणुका टाळणे योग्य नाही. त्या सुरू केल्यास पुन्हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ कार्यकर्त्यांची फळी आणि देशहितासाठी एक पिढी उभी राहू शकेल.
-गुरुमित बग्गा, नगरसेवक, विद्यार्थी चळवळीतील अग्रणी

पॉलिसीमेकर घडविण्यासाठी निवडणुका
लोकशाही राज्यात पॉलिसीमेकर घडवायचे असतील तर समाजकारण, राजकारण, अर्थकारण यांची जाण असणे गरजेचे आहे आणि ही जाण महाविद्यालयीन निवडणुकांपासून मिळते. त्यासाठी गुणवत्तेचाही विचार करणे गरजेचे आहे. निवडणुका बंद झाल्यापासून नेतृत्वविकास खुंटला आहे. निवडणुका घेण्यासाठी काही निकषही ठरविणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांचीही भूमिका आणि जबाबदारी यात महत्त्वाची ठरणार असून, त्यांना लोकशाही विकासाचे केंद्र म्हणून काम करावे लागेल. कोणताही गोंधळ न होता या निवडणुका पार पडाव्यात.
-प्रा. कुणाल वाघ, नगरसेवक, विद्यार्थी चळवळीतील अग्रणी

संस्थाचालकांना विश्वासात घ्यावे
पूर्वी निवडणुकांमध्ये भांडणे आणि मारामार्‍या होत असत. आता मात्र पिस्तुलाचाही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वीच्या विद्यार्थी नेत्यांमध्ये ज्या प्रकारचा समजूतदारपणा होता, तितकाच समजूतदारपणा आता आहे का, हा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. या निवडणुकांना मान्यता देताना संस्थाचालकांनादेखील विश्वासात घेणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये महाविद्यालयांचे नुकसान करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल होता. हे नुकसान टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचाही विचार या निमित्ताने व्हायला पाहिजे.
-अशोक सावंत, संस्थाचालक तथा विद्यार्थी चळवळीतील अग्रणी

सुचवा उपाययोजना
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडणुका पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. मात्र, यासाठी आचारसंहिता काटेकोरपणे केली जावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जातेय. या निवडणुकीला राज्य शासनाने मान्यता दिल्यास आचारसंहितेची रूपरेषा कशी असावी, या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी काय उपाययोजना असाव्यात याविषयी विद्यार्थी, पालक आणि संघटनांचे प्रतिनिधी यांनी आपल्या प्रतिक्रिया 9975547616 किंवा 9922184727 या क्रमांकांवर नोंदवाव्यात.

फारसा राजकीय हस्तक्षेप नसावा
निवडणुका बंद का झाल्या, त्यामागील कारणांचा विचार व्हायला हवा. त्या काळात गुंडगिरीचा उद्रेक झाला होता. हे त्यामागील एक कारण. निवडणुकांतील विद्यार्थ्यांच्या मागे वेगळेच नेतृत्व असते. विद्यार्थी नाममात्र झालेले आहेत. राजकीय हस्तक्षेप थांबवून निवडणुकांवर महाविद्यालयाचा एकसूत्री अंकुश असायला हवा. असे झाले तर निवडणुका सुरळीत पार पडतील. मुलांच्या विचारसरणीवर पक्षीय प्रभाव नको. त्यांना प्रवाहात आणणे गरजेचे असते. त्यासाठी निवडणुका गरजेच्या आहेत.
-प्रा. सुहास फरांदे, माजी प्रदेशाध्यक्ष, भाजयुमो

हाडाचा कार्यकर्ता निवडणुकांतून घडतो..
खरा कार्यकर्ता हा चळवळीत घडतो. त्याची सामाजिक बांधिलकी वाढायला हवी. विद्यार्थ्यांचं नेतृत्व बाहेरची कुणीतरी व्यक्ती करत असते, सतत त्यांच्यावर बाहेरून दबाव असतो. असे व्हायला नको. हाडाचा कार्यकर्ता हा चळवळ वा निवडणुकांतूनच तयार होतो. निवडणुका बंद केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या संख्येतच आता घट झाली आहे. असेच घडत राहिले तर नेतृत्व कसे तयार होणार?
-देवानंद बिरारी, माजी जिल्हाध्यक्ष भारतीय विद्यार्थी सेना

विद्यार्थी संघटना लयास गेल्या
शैक्षणिक प्रश्नांनी थैमान मांडले असताना विद्यार्थी संघटनांचे अस्तित्व सध्या दिसत नाही. महाविद्यालयाच्या बंद पडलेल्या निवडणुका हेच त्याचे कारण आहे. या निवडणुकांमधून राजकीय पक्षांनाही मोठी ताकद मिळायची. आज नेतृत्वच शिल्लक राहिलेले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अन्याय निमूटपणे सहन करावा लागतो. विद्यार्थी चळवळीला पुन्हा उभारी देण्यासाठी निवडणुकीची आचारसंहिता तयार करणे आवश्यक आहे.
-अनिल चौघुले, एनएसयूआयचे माजी जिल्हाध्यक्ष, बीवायके महाविद्यालयाचे माजी सीआर

सरकारचा आणि महाविद्यालयांचाही आडमुठेपणा
शैक्षणिक गुणवत्तेचे लेबल लावून विद्यार्थी चळवळ मोडीत काढण्याचे काम सरकारने केले आहे. किंबहुना, वारसा नसलेल्यांचे नेतृत्व पुढे येऊच नये यासाठी हा कट रचला गेल्याचा संशय येतो. निवडणुका होत नसल्यामुळे कार्यकर्ता घडविण्याची प्रक्रियाच बंद पडली आहे. आपल्याला सोयीस्कर ठरेल अशाच विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती करून महाविद्यालयीन व्यवस्थापनानेही नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांना डावलले आहे.
-रवींद्र जाधव, भाविसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा बीवायके महाविद्यालयाचे माजी सीआर

मतदार घडविण्याचे काम
महाविद्यालयीन निवडणुका होणे गरजेचेच आहे. आजची तरुण पिढी एकांगी विचार करताना दिसते. समाजशास्त्राचे ज्ञानही त्यांना शून्य असते. म्हणून महाविद्यालयातच लोकशाही आणि त्याबरोबर मतदानाचे महत्त्व पटण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदार्‍यांचीही चांगली जाणीव होईल. या निवडणुकांमधून ज्याप्रमाणे नेतृत्व पुढे येते, त्याचप्रमाणे चांगला मतदारही घडवला जातो.
-डॉ. शैलेंद्र पाटील, माजी डिबेट सेक्रेटरी, बी.जे. मेडिकल कॉलेज

सांस्कृतिक चालना
विद्यार्थी चळवळीतूनच राजकारणाचा पाया पक्का होत होता. सांस्कृतिक घडामोडींनाही चालना मिळत होती. जाती-पातीची बंधने झुगारून विद्यार्थी एकत्र येत होते. विधायक विचार होत होते; परंतु या निवडणुका बंद करून त्यांच्या हक्काचे व्यासपीठच हिरावले आहे.
-प्रा. राजू देसले, एआयएसएफ प्रदेश सल्लागार

गांभीर्य कळेल
विद्यार्थी निवडणुकांच्या निमित्ताने स्वत:च्या वर्तणुकीची जबाबदारी घेतील. संयम आणि जाणीव यातून निर्माण होते. त्यांचा वेळही वाया जाणार नाही. मुलांमध्ये समन्वय साधण्याची, गटाने काम करण्याची वृत्ती निवडणुकांद्वारे निर्माण होईल. निवडणुका व्हायलाच हव्यात.
-श्यामला चव्हाण, समता आंदोलन कार्यकर्त्या