आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील भरवस्तीतील रंगाचे गुदाम आगीत खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - सारडा सर्कल परिसरातील रंगाच्या गुदामाला आग लागून लाखो रुपयांचा रंग भस्मसात झाला. शुक्रवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या आठ बंबांनी अध्र्या तासात आग आटोक्यात आणली.

सारडा सर्कल परिसरातील जितेंद्र शोरूमसमोर हे गुदाम आहे. या ठिकाणी रंगही तयार करण्यात येत होता. दुपारची वेळ असल्याने बहुतेक कामगार नमाजासाठी गेल्याने जीवित हानी टळली. आग लागल्याचे कळताच या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. यामुळे सारडा सर्कल ते शालिमारपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.

भरवस्तीमधील युसूफ पेंट्स या रंगाच्या गुदामाला आग लागल्याची माहिती शेजारचे दुकानदार कैलास गांगुर्डे व मनीष गणोरे यांनी अग्निशामक दलाला कळवली. यानंतर लगेचच बंब दाखल झाले. या ठिकाणी अरुंद जागा असल्याने बंब आत जाण्यास अडचण होती. त्यातच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील दुकानांना वेढले. पत्र्याचे गुदाम असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना आतपर्यंत पाणी मारता येत नव्हते. धुराने जवानांची दमछाक होत होती. तरीही काही जवान जॉकेट परिधान करून आग विझवत होते. अध्र्या तासाच्या पर्शिमाने ही आग आटोक्यात आली. दरम्यान, गर्दी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

फक्त विक्रीची परवानगी : बादलीवाला यांची रंग तयार करण्याची कंपनी आहे. या ठिकाणी किरकोळ विक्री करण्याकरिता परवानगी आहे. मात्र, काही दिवसांपासून येथे अनधिकृतरीत्या रंग तयार करण्याचे काम सुरू होते. याबाबत शेजारील दुकानदारांनी तक्रारही केली होती. तरीही पॅकिंगचे काम येथे सुरू होते.

रंग भरण्याचे काम : अबेद्दीन बादलीवाला व मोइज अबेद्दीन बादलीवाला यांच्या या गुदामात गॅस कॉम्प्रेसरच्या साह्याने डब्यामध्ये रंग भरण्याचे काम केले जात होते. येथील कामगार नमाजासाठी गेले होते. शेजारील दुकानात वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याची ठिणगी पडल्याने आग लागल्याची चर्चा येथे सुरू होती.
परवाना नसल्यास कारवाई
भरवस्तीमधील या रंगाच्या गुदामात अनधिकृतपणे गॅस कॉम्प्रेसरने रंग डब्यात भरले जात होते. याबाबत परवाना आहे की नाही, याची खात्री करण्यात येईल. परवाना नसल्यास कारवाई करण्यात येईल. अनिल महाजन, मुख्य अग्निशामक अधिकारी