आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोम्बिंगमध्ये 34 गुन्हेगार ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-शहरातील घरफोड्या, लूटमार, वाहनचोरी, दरोड्याचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा कोम्बिंग मोहीम राबविण्यात आली. शनिवारी रात्री 9 वाजेपासून पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या कोम्बिंगमध्ये 34 सराईत गुन्हेगार हाती लागले असून, चौकाचौकांत 60 टवाळखोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक अंतर्गत उपआयुक्त साहेबराव पाटील, सहायक आयुक्त गणेश शिंदे यांनी सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर आणि भद्रकाली, तर परिमंडळ दोन अंतर्गत उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी, हॉटेल, लॉजेसची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर 150 वाहनांच्या तपासणीत 50 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील 75हून अधिक गुन्हेगारांची तपासणी केली असता 35 गुन्हेगार आढळून आले. तसेच, उपनगर हद्दीत अवैध मद्यविक्री करणार्‍या दोघांविरुद्ध आणि रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणार्‍या पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

नाशिकरोडला 27 वाहनांवर कारवाई :
नाशिकरोड येथे उपनगर आणि नाशिकरोड पोलिसांनी जेलरोड आणि जय भवानीरोडवर सकाळी 6 ते 9 वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन केले. यात रेकॉर्डवरील एकूण दहा गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. त्याचप्रमाणे 27 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे तीन हजार सहा रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या वेळी पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, निरीक्षक मौला सय्यद यांच्यासह 25 कर्मचार्‍यांनी या मोहिमेत भाग घेतला.

तर उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जय भवानी मार्गावरील भालेराव मळा येथे सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत राबविलेल्या मोहिमेत पोलिसांनी 55 वाहनांची तपासणी करून 18 वाहनांवर कारवाई केली. परिसरातील बेकायदेशीर देशी दारूच्या अड्डय़ावर छापा टाकून एकावर कारवाई केली आहे. या वेळी सहायक पोलिस आयुक्त हेमराजसिंग राजपूत, वरिष्ठ निरीक्षक कोंडिराम पोपेरे यांच्यासह 11 अधिकारी आणि 72 कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.

रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविण्याचा प्रकार
सातपूर टाउन पोलिस चौकी परिसरात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वाद्य वाजविण्यास 10 वाजेपर्यंत परवानगी घेतली. मात्र, कार्यकर्त्यांनी उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात पक्षाचे प्रशांत कटारे आणि राजन भालेराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड येथे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये भालेराव मळ्यात अवैध दारू अड्डय़ावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी मद्य विक्री करणार्‍या तरुणांना ताब्यात घेताना पोलिस.