आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी डॉक्टरांना आता संवाद कौशल्याचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भावी डॉक्टरांसाठी गुणसंवाद कौशल्य उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डॉक्टरांचा रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यात निर्माण होणारे वाद कमी होण्यास मदत मिळणार आहे.

डॉक्टरांनी योग्य पद्धतीने संवाद साधल्यास होणारी मोठी दुर्घटना टळू शकते. याचे महत्त्व हेरून आरोग्य विद्यापीठाने या उपक्रमाचा समावेश थेट वैद्यकीय विभागाच्या विविध शाखांच्या अभ्यासक्रमातच करण्याचा निर्णय घेतला आहे. या मध्ये तीन प्रकारचे मॉड्युल्स असणार आहेत. मात्र, अद्याप ते तयार झाले नसून, ते कसे असावे याबाबत विचारविनिमय आणि अभ्यास सुरू आहे, परंतु पदवीच्या तिन्ही वर्षाच्या अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव केला जाणार आहे. जेणेकरून हे शिकाऊ डॉक्टर प्रत्यक्षात स्वत:चे क्लिनिक सुरू करण्यापूर्वीच परिणामकारक संवाद साधूू शकतील. एखादी अप्रिय घटना घडल्यास ती कशा पद्धतीने रुग्णांच्या नातेवाइकांना तसेच उपस्थित जमावास सांगून परिस्थिती नियंत्रणात आणावी याची शिकवण त्यात दिली जाईल. त्याचबरोबर एखाद्या रुग्णास मोठा आजार झाला असल्यास त्याची माहिती रुग्णास दिल्यास त्याची प्रकृती बिघडण्याची आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची माहिती कशा पद्धतीने द्यावी याचेही प्रशिक्षण यात दिले जाणार आहे. याचबरोबर रुग्णालयाच्या बिलाबरोबर अनेक कारणांवरून वाद होतात. त्यावर कशी मात करावी याचाही यात समावेश असणार आहे. या उपक्रमामुळे रुग्णांसोबत होणार वाद निश्चित टाळता येतील, असे मत अनेक डॉक्टर आणि सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.

प्रशिक्षणासाठी तज्ज्ञांची करणार नेमणूक
गुणसंवाद कौशल्य हा डॉक्टरांच्या जीवनातील अविभाज्य भाग असल्याने त्याचे प्रशिक्षणही त्याच क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत देणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने खास तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी विद्यापीठाने 50 लाख रुपयांची तरतूदही केली आहे. त्यामुळे हा उपक्रम पुढील वर्षापासून सुरू होण्याची शक्यताही आहे.

अभ्यासक्रमावर विचार
गुणसंवाद कौशल्याचा अभ्यासक्रम नेमका कसा असेल याचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी बजेमध्ये तरतूदही केली आहे. यासाठी तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार असून डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना संवाद साधताना नक्कीच मदत होईल.
-डॉ. अरुण जामकर, कुलगुरु आरोग्य विज्ञान विद्यापीठ