आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी गेले चक्रावून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उच्च प्रशासनात मराठी टक्का वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवरून होणा-या प्रयत्नांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अद्यापही म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी चक्रावून गेले आहेत.
पूर्व आणि मुख्य परीक्षेचे नियोजन आयोगाने अचानक बदलल्याने बाहेरगावाहून खास स्पर्धा परीक्षांसाठी नाशिकमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना शहरातील मुक्कामही वाढवावा लागला आहे. या परीक्षांबाबत संवाद साधण्यासाठी आधुनिक साधनांचा उपयोगही अद्याप आयोगाला प्रभावीपणे करता येत नसल्याने स्पर्धा परीक्षांसाठी अलीकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक बनलेले विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. यामुळे आयोगाच्या परीक्षांऐवजी मराठी विद्यार्थी बॅँका, स्टाफ सिलेक्शनसारख्या अन्य पर्यायी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आयोगाने नव्याने जाहीर केल्यानुसार पूर्वपरीक्षा आता फेब्रुवारीतून जूनमध्ये गेल्याने काही अंशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात शिथिलता आल्याचे चित्र आहे. स्पर्धा परीक्षांच्या शहरातील काही खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नव्याने परीक्षेची तारीख जाहीर होण्याआधी नोट्सचे वितरण करण्यात येत होते. मात्र, निर्धारित दिवशी परीक्षा होणार नसल्याची बातमी पसरताच या नोट्स वितरणावर परिणाम झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
आयोगाने आपल्या संकेतस्थळावरून वर्षभराचे आयोगाचे वेळापत्रक देण्याचे जाहीर केले होते. यानंतर या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली तारीख मधूनच काढून घेतल्यानंतर जवळपास महिनाभर विद्यार्थी नव्या तारखेच्या प्रतीक्षेत होते. यासाठी दररोज संकेतस्थळांना भेट दिल्यानंतरही पदरी निराशाच पडत होती.
आयोगाबद्दल विद्यार्थी नाराज - सा-या गोंधळाला आयोगाची संवाद पद्धतच जबाबदार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. संकेतस्थळावर सातत्याने बदलण्यात येणा-या तारखा, बदलता अभ्यासक्रम आणि बदलत्या परीक्षा पद्धतींसाठी ढिसाळ संदेशवहन यामुळे नाराजी आहे. परीक्षाविषयक माहितीसाठी आयोगाने विद्यार्थ्यांंना एसएमएस सुविधेचे आमिष दाखविल्यानंतर वर्ष उलटूनही त्याबाबत चालढकल केली जात आहे.