आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक न्यायालयाकडे तक्रारदारांचा वाढता अाेढा, जलद निकालांमुळे तक्रारदारांची संख्या वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्राहक न्यायालयात तक्रारदारांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राहक न्यायालयात तक्रारदारांना वेळेत न्याय मिळत असल्याचा अनुभव येत असल्याने ग्राहकहित जपले जात असल्याने तक्रारदारांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एक प्रकारे ग्राहकांमध्ये अापल्या हक्कांविषयी जागृती हाेत असल्याचेच हे निदर्शक असल्याचा निष्कर्ष ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी काढला अाहे.
ग्राहक न्यायालयाची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. त्यापूर्वी ग्राहक हितसंबंधी तक्रारींचा निपटारा दिवाणी न्यायालयात केला जात होता. मात्र, या न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता शासनस्तरावर ग्राहक न्यायमंचाची स्थापना करण्यात आली. ग्राहक न्यायमंचाला न्यायालयाचा दर्जा देण्यात आला. स्वतंत्र जागा देण्यात आली. काही दिवसांपूर्वी ग्राहक न्यायमंचाचे खंडपीठही नाशिकमध्ये सुरू झाले. ग्राहक न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये बांधकाम व्यावसायिकांसह आयुर्विमा कंपनी, बँका आणि खासगी रुग्णालयांना दंडाची शिक्षा ठोठावली. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट कारागृहात पाठविण्यात आले. ग्राहक न्यायालयात न्याय मिळत असल्याचे यातून दिसल्याने शेकडो ग्राहकांमध्ये जागृती निर्माण झाली.

याअाधी ग्राहक न्यायालयात २५ लाख रुपयांच्या वरील दाव्यांसाठी मुंबई खंडपीठाकडे दाद मागावी लागत होती. सन २०१५ मध्ये खंडपीठ नाशिकमध्येच सुरू झाल्याने तक्रारदारांना दिलासा मिळाला आहे. सुनावणीला अधिक वेळ लागत नसल्याने निकालांची संख्याही वाढली अाहे. २०१० मध्ये अवघ्या ३५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये वाढ होत २०१५ मध्ये त्या दुपटीने वाढून ६३४ पर्यंत जाऊन पाेहाेचल्या. दाखल तक्रारीपैकी तब्बल ८० ते ८५ टक्के तक्रारींचा तत्काळ निपटारा होत असल्याने तक्रारदार ग्राहकांचा या न्यायालयावरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.