आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - मुंबई विमानतळाला पर्यायी विमानतळ म्हणून कार्यान्वित होणार्या ‘एचएएल’स्थित ओझरच्या नाशिक विमानतळ टर्मिनलचे काम दिवाळीपर्यंत पूर्णत्वास नेण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. पालकमंत्र्यांनी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्यासह या कामाची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.
तीनशे प्रवासी क्षमतेचे हे विमानतळ असून, ही संपूर्ण इमारत वातानुकूलित तसेच दोन्ही बाजूंनी उष्णतारोधक काचेची असणार आहे. या इमारतीची उंची सुमारे साडेतेरा मीटर असून, क्षेत्रफळ 8,713 चौरस मीटर असणार आहे. या ठिकाणी आगमन व निर्गमनसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार प्रस्तावित आहे. यात दोन्ही बाजूला मेझनीन फ्लोअर अर्थात मधला मजला असेल. एकूण 148 कॉलमवर ही इमारत उभी राहत असून, जोत्यापर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे मुख्य अभियंता नागनाथ जळकोटे आणि अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांनी पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार समीर भुजबळ यांना दिली.
या विमानतळाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन आणि एचएएलमध्ये यासंदर्भात करारनामा झाला होता. या प्रकल्पासाठी सुधारित प्रस्तावानुसार सुमारे सत्तर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नाशिकचे वाढते औद्योगीकीकरण, आगामी कुंभमेळा, वाढते पर्यटन तसेच या ठिकाणचे धार्मिक महत्त्व, शिर्डी, त्र्यंबकेश्वर ही देवस्थाने नाशिकजवळ असल्यामुळे देश-विदेशातील भाविकांना नाशिकचे विमानतळ सोयीचे ठरणार आहे. नाशिकला नुकताच भारतातील पर्यटनासाठी बेस्ट सिटी, तसेच आरोग्य सुविधांबाबत वेगाने दर्जा उंचावणारे शहर म्हणून दोन विभिन्न नामवंत वृत्तसमूहांनी पारितोषिक देऊन गौरविले आहे.
ओझर विमानतळावर विमानाची देखभाल-दुरुस्ती, तसेच एम.आर.ओ. प्रकल्प सुरू करण्यासाठीही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद येथून हॉपिंग फ्लाईट सुरू करण्यासाठी खासदार समीर भुजबळ यांनी प्रयत्न केले आहेत. नाशिकचे विमानतळ मुंबई विमानतळाला पर्यायी विमानतळ असू शकते, असे यापूर्वीच त्यांनी संबंधितांना पटवून दिले आहे.
सध्या मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमाने पार्किंगसाठी अहमदाबादला जातात. त्याऐवजी ती नाशिकला यावीत, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विमान कंपन्यांना यापूर्वीच आहे. तसेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील निर्यातशील अँग्रो उत्पादनांना हॅलकोनच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अशा सुविधेची गरज आहे. मुंबईपासून नाशिक आणि अहमदाबादचे हवाई अंतर नॉटिकल मैलमध्ये, हवाई वेळ प्रवासासाठी लागणारे इंधन, रन-वेची लांबी यातील फरक इत्यादी तांत्रिक माहितीही संबंधितांना देण्यात आली आहे.
प्रस्तावित ओझर येथील नाशिक विमानतळावर चेक इन काउंटर, कन्व्हेअर बेल्ट, फायर अलार्म, फायर फायटिंग सिस्टिम, एलसीडी डिस्प्ले, लॅन, व्हीआयपी लाउंज, पॅसेंजर लाउंज, क्रू रेस्ट रूम, एअरलाइन्स अधिकारी, सुरक्षा अधिकारी, विमानतळ प्राधिकरण, पायलट क्रू रेस्ट रूम, कॅफेटेरिआ, एक्सरे मशिन्स इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. विमानतळ परिसरात अँप्रोच रोड तसेच रन-वेलगतचे रोड, टू वे पार्किंग, आकर्षक लँडस्केपिंग, कारंजा इत्यादी सुविधांनी या परिसराचा विकास करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. या वेळी आमदार जयंत जाधव, दिलीप खैरे, कार्यकारी अभियंता आर. टी. पाटील, उपअभियंता राकेश सोनवणे, सहायक अभियंता श्याम मिसाळ, हर्ष कन्स्ट्रक्शनचे विलास बिरारी आदी उपस्थित होते.
विमानांची पार्किंग नाशिकमध्ये शक्य
मुंबईपासून नाशिक आणि अहमदाबादचे अनुक्रमे अंतर 97.8, 240 नॉटिकल मैल आहे. एअरबस 320 किंवा बोइंग 737, 800 ला लागणारा हवाई वेळ 0.30, 0.46 मिनिटे, लागणारे इंधन 750, 2000 लिटर रन-वेचे इलेव्हेशन नाशिक 1962 फूट, अहमदाबादचे 189 फूट असे आहे. ओझर येथील धावपट्टीची सध्याची लांबी तीन हजार मीटर आहे, तर रूंदी 60 मीटर आहे. ही लांबी 4 हजार मीटर करणे आणि रूंदी 75 मीटर करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे नाशिकला ही विमाने पार्किंगला आणणे विमान कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.