नाशिक: परीक्षेची भिती अन् अभ्यासाचा ताण विसरुन रोज तीन ते चार तास अभ्यास करून प्रत्येक विषयातील किचकट अवघड वाटणाऱ्या कन्सेप्ट क्लिअर करत नेहा नेमाडे हिने जिद्द चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत १०० टक्के गुण मिळवले. तर अक्षता पाटील हिने ९९.८० टक्के रुतुजा पाटील हिने ९४ टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळवले.
पाठ्यपुस्तकांवरच अवलंबून राहून नियमित अभ्यास सेल्फ स्टडीच्या मेहनतीवर अक्षता रुतुजा या दोघी बहिणींनी दहावीच्या परीक्षेत यशाचे शिखर गाठले अाहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या रचना विद्यालयातील विद्यार्थिनी नेहा नेमाडे हिने १०० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळवले. तर अक्षता पाटील या विद्यार्थिनीने ९९.८० टक्के तर उत्कर्ष चव्हाण याने ९८.२० टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळवले.
रचना विद्यालयाचा शाळेचा एकूण निकाल ९८.१६ टक्के लागला आहे. मुख्य म्हणजे अपंग एकात्मिक शिक्षण योजना (कर्णबधिर विभाग) याचादेखील १०० टक्के निकाल लागला अाहे. शाळेतील ९० टक्क्यांहून अधिकचे गुण मिळवणाऱ्यांमध्ये ५५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर मनिषा बडगुजर हिने ८० टक्के गुण मिळवले अाहेत.
मेडिकलमध्ये करिअरचे ध्येय
सिडकोतील सर्वसामान्य कुटुंबातील नेहाने जिद्दीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले. नेहाचे आई आश्विनी वडिल कमलाकर नेमाडे हे दोघेही शिक्षक आहेत. आई वडिलांकडून नेहमी प्रोत्साहन मिळाल्यानेच परीक्षेत यश मिळवू शकल्याचे नेहाने सांगितले. मेडिकल क्षेत्रात करिअर करण्याचे नेहाचे ध्येय असून त्यासाठी कठोर मेहनत करण्याचीही तयारी असल्याने तिने सांगितले.
सनदी अधिकारी होण्याचे अक्षताचे स्वप्न
शालेय पाठ्यपुस्तकांवरच्या मदतीने सेल्फ स्टडी करत अक्षता पाटील हिने दहावीच्या परीक्षेत ९९.८० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे. महत्वाचे म्हणजे अक्षताने दहावीचा अभ्यास करताना कोणत्याही नोटस गाईड, खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा अाधार घेतला नाही. वडिल देवेंद्र आई स्वाती हे दोघेही शिक्षक असून त्यांनी अक्षताला दहावीच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. वैद्यकीय शाखेची पदवी पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे स्पर्धा परीक्षा देण्याची अक्षताची इच्छा असून सनदी अधिकारी होऊन सेवा करण्याचे तिचे स्वप्न आहे. तर अक्षताची जुळी बहिण रुतुजा हिनेही ९३ टक्के गुण मिळवून मोठे यश मिळवले आहे.