आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conflicts News In Marathi, Conflicts In Mahayuti At Nashik, Divya Marathi

महायुतीच्या भाजप-रिपाइंमधील मतभेद चव्हाट्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- स्थानिक पातळीवर महायुतीत आलबेल असल्याचे वरचेवर दिसत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. महायुतीतील तीन पक्षांपैकी भाजप व रिपाइंच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांना एकमेकांच्या कार्यक्रमाचे वावडे असल्याचे अलीकडील तीन कार्यक्रमांत दिसले. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
केंद्र व राज्यात सत्तांतरासाठी महायुतीचे नेते राज्यस्तरावर हातात हात घेऊन एकजुटीचे दर्शन घडवत आहेत. दुसरीकडे मात्र, स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये मनोमिलन होऊ शकलेले नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांकडे महायुतीतील भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वतरुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. पालिकेने उभारलेल्या कविवर्य वामनदादा कर्डक जलकुंभाचा लोकार्पण सोहळा खासदार आठवले यांच्या हस्ते प्रभाग 36 मधील भीमनगर येथे पार पडला. भाजपच्या उपमहापौरांसह महानगर, स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अशाचप्रकारे दोन महिन्यांपूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन खासदार आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाजप नेते या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. म्हणूनच की काय, गेल्या आठवड्यात भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते अटल ज्ञान संकुल व लोकमान्य उद्यान लोकार्पण सोहळ्याला रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी हजेरी लावली नव्हती. यावरून रिपाइं व भाजपमध्ये मनोमिलन झाले नसल्याचे दिसून आले. नगरसेविका ललिता भालेराव यांनी प्रत्यक्ष भेटून भाजपच्या लोकप्रतिनिधींना सोहळ्याचे निमंत्रण देऊनही या कार्यक्रमाकडे कोणीच फिरकले नाही. सेनेकडून मानापानाशिवाय महायुतीच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यात येत आहे.
भाजपचे नुकसान
नाशिकरोड-देवळाली, पंचवटी या मतदारसंघांत शिवसेना व रिपाइं आठवले गटाचे वर्चस्व आहे. जागा वाटपात रिपाइंकडे दोन्हींपैकी एकही मतदारसंघ नाही. देवळाली शिवसेनेकडे, तर पंचवटी भाजपकडे असल्याने रिपाइंबरोबरील मतभेदाचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसणार आहे. भाजपसह मनसेने लोकार्पण सोहळ्यावर अघोषित बहिष्कार टाकला. महापौरांसह प्रभागातील दुसरे मनसे नगरसेवक या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. ललिता भालेराव यांनी होर्डिंगवर केवळ र्शी. व सौ. भालेराव यांचेच फोटो छापले. त्यामुळे मनसेने बहिष्कार टाकल्याची चर्चा होती. शिवाय, महायुतीतील नेत्यांचा संयोजकांना विसर पडला.